यमराजाला सक्तीची विश्रांती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पश्‍चिम रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना शिक्षा म्हणून पाठीवर उचलून नेत त्यांना समज देणारा यमराज सध्या आजारी पडला आहे.

मुंबई : पश्‍चिम रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना शिक्षा म्हणून पाठीवर उचलून नेत त्यांना समज देणारा यमराज सध्या आजारी पडला आहे. पाठीवर प्रवाशांना उचलल्याने त्याच्या पाठीत चमक भरली असून, डॉक्‍टरांनी त्याला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

पश्‍चिम रेल्वेवर रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रवाशांमध्ये जनजागृती करणाऱ्या यमराजाला डॉक्‍टरांनी सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना वारंवार उचलून यमराजाची भूमिका वठवणाऱ्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा जवान स्वप्नील होममाने याच्या पाठीत चमक भरली आहे. त्यामुळे आरपीएफने सुरू केलेल्या या मोहिमेत यमराजाचे काम दुसऱ्या जवानाला देण्यात आले आहे. 

लोकांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत, म्हणून जागरूकता वाढवण्यासाठी पश्‍चिम रेल्वेवर यमराजाला पाचारण करण्याच्या आरपीएफच्या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही विशेष मोहीम 6 नोव्हेंबरपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी यमराजाचा पेहराव भाड्याने घेण्यात आला असून त्यासाठी प्रतिदिवस 500 रुपये इतके भाडे आहे. या मोहिमेत यमराज रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना खांद्यावर उचलतो. मात्र रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची संख्या इतकी जास्त आहे की यमराजाची भूमिका करणाऱ्या जवानाची पाठ आणि अंगाचे दुखने बाहेर आले आहे. त्यामुळे यमराजाची जबाबदारी दुसऱ्या जवानाच्या खांद्यावर लादण्यात आली आहे. 

आयुक्‍तांकडून सूचना 

यमराज गेल्या तीन दिवसांपासून प्रवाशांना खांद्यावर उचलत असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर तो चर्चेचा विषय ठरला. पण जेव्हा यमराजाच्या पाठीत उसण भरली याची माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांना मिळाल्यानंतर प्रवाशांना उचलू नये, अशा सूचना दिल्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yamaraja forced to rest by doctors