esakal | राहुल गांधींवर केलेल्या टीकेबाबत यशोमती ठाकूर कडाडल्या; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधींवर केलेल्या टीकेबाबत यशोमती ठाकूर कडाडल्या; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना खडे बोल सुनावले आहेत

राहुल गांधींवर केलेल्या टीकेबाबत यशोमती ठाकूर कडाडल्या; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीचे कौतुक करण्यात येत होते. परंतु एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना खडे बोल सुनावले आहेत.

हेही वाचा - हवा गुणवत्ता सुधारणेत मुंबईकरांची सर्वोत्कृष्ठ कामगिरी; केंद्राकडूनही सर्वाधिक अनुदान

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांकडून कॉंग्रेस हायकमांडवर टीका केली गेल्याचे कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. नुकत्याच एका वृत्तपत्राने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. पवार यांना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी विचारण्यात आले. त्यावेळी पवार यांनी राहुल गांधी यांच्या कामात सातत्य नसल्याचे म्हटले होते. त्यावर महाराष्ट्र कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे. 

कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट करून अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली आहे. या ट्विटमधून ठाकूर यांनी थेट महाविकास आघाडीच्या स्थिरतेबाबत इशारा दिला आहे. त्या म्हणतात की, ' आघाडी मधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे. '

यशोमती ठाकूर यांनी कॉंग्रेस हायकमांडवर झालेल्या टीकेला लगेच प्रतिक्रीया दिली. ठाकूर यांनी थेट, ' हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर कॉंग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका टीप्पणी करणं टाळावं' असा इशाराचा मित्रपक्षांना दिला. यावर आता आणखी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कोणत्या प्रतिक्रीया येतात हे पाहणं महत्वाचं आहे.

loading image