महापौराच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - महापौरपदाच्या शर्यतीत असलेले डॉकयार्ड येथील शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांचा पत्ता पुन्हा कापण्यात आला आहे. गेल्या वेळी आरक्षण असतानाही त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना महापौरपद देण्यात आले नव्हते. आता त्यांची पक्षाने गटनेतेपदी निवड केल्याने त्यांना सभागृहनेतेपद मिळण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - महापौरपदाच्या शर्यतीत असलेले डॉकयार्ड येथील शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांचा पत्ता पुन्हा कापण्यात आला आहे. गेल्या वेळी आरक्षण असतानाही त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना महापौरपद देण्यात आले नव्हते. आता त्यांची पक्षाने गटनेतेपदी निवड केल्याने त्यांना सभागृहनेतेपद मिळण्याची शक्‍यता आहे.

महिला एस. सी. वर्गासाठी महापौरपद आरक्षित असताना यशवंत जाधव यांनी पत्नीला हे पद मिळवण्याकरता प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्याऐवजी पक्षाने स्नेहल आंबेकर यांना महापौरपद दिले. आताही महापौरपद खुले असून, यशवंत जावध यांचेही नाव या पदासाठी स्पर्धेत होते. मात्र, "मातोश्री'ने त्यांचा पत्ता कापल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेने त्यांची आज महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती केली. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना पालिकेतील सर्वांत मोठा पक्ष असल्याने जाधव यांना सभागृहनेतेपद मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, हे पद मिळाल्याने जाधव आपोआप महापौर पदाच्या स्पर्धेतून बाद झाले आहेत. पालिकेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आणि पक्षातील उपनेतेपद ही जाधव यांची जमेची बाजू होती. महापौर नाही तर किमान स्थायी समितीचे अध्यक्षपद तरी मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, पक्षाने त्यांना सभागृह नेत्याची खुर्ची दिली.

वैद्यांच्या गळ्यात माळ?
माजी महापौर मिलिंद वैद्य यांना मोठ्या जबाबदारीला तयार राहा, असे "मातोश्री'ने सूचित केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे नाव महापौरपदाच्या स्पर्धेत सर्वांत पुढे आहे. पेशाने शिक्षक असलेले सांताक्रूझ येथील विश्‍वनाथ महाडेश्‍वर, मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे यांची नावेही स्पर्धेत आहे. भांडुप येथील रमेश कोरगावकर चौथ्यांदा निवडून आल्याने ते सध्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यानंतर सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक आहेत. महिलेला महापौरपद द्यायचे झाल्यास माजी महापौर विशाखा राऊत, शुभदा गुडेकर, राजूल पटेल आणि किशोरी पेडणेकर यांची नावे आघाडीवर आहेत.

Web Title: yashwant jadhav out in mayor race