यंदाही मुंबईत पर्यावरणस्नेही मखरांचा थाट!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

यंदाच्या गणेशोत्सवात थर्माकोलपेक्षा तुलनेने महाग असलेल्या पर्यावरणस्नेही मखरांना भक्तांची पसंती मिळत आहे...

मुंबई : गणेशोत्सवाची धूम काही दिवसांतच सुरू होईल. गणेशाच्या स्वागतासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. सर्वाधिक भर गणेशमूर्तीच्या सजावटीवर असून यंदा थर्माकोलची मखरे बाजारात हद्दपार झाल्याचे चित्र आहे. पुठ्ठा, कार्डबोर्ड, सनबोर्ड, जूट, कापड, बांबूच्या चटई आदी विविध पर्यावरणस्नेही मखरे बाजारात दाखल झाली आहेत. दादर, परळ, लालबाग आदी परिसरात आता मखरांचा बाजार खुलला आहे. थर्माकोलच्या तुलनेत पर्यावरणस्नेही मखर थोडेसे महाग असल्याने थोडे जास्त पैसे मोजावे लागत असले तरी ग्राहकांची त्यांनाच पसंती मिळत आहे.

एकपासून सहा फुटांपर्यंतची मखरे बाजारात उपलब्ध आहेत. थर्माकोलसारखी वाटणारी मखरे प्रत्यक्षात मात्र पुठ्ठ्यांनी तयार करण्यात आली आहेत. बांबूच्या चटईचा आणि आकर्षक डिझाईनच्या कापडाचा वापर करून तयार करण्यात आलेली मखरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातील काही मखरे स्पंजपासून बनवण्यात आली आहेत. त्यांची किंमत हजार ते १५ हजारांपर्यंत आहेत. सेवन स्टार, मयूर आसन, पिसारा आसन, मोर झुला, सूर्य आसन आदी विविध प्रकार त्यात उपलब्ध आहेत. एलईडी दिव्यांमुळे मखर उजळून निघत असल्याने ग्राहकांना त्याचीच भुरळ आहे.

पर्यावरणस्नेही आसन बनवण्यासाठी थर्माकोलच्या तुलनेत खर्च जास्त होतो. त्यामुळे अशा मखराच्या किमती थोड्या जास्त आहेत. सर्व मखर फोल्डिंगचे आहेत, अशी माहिती हरदेव आर्टस्‌चे संदेश दबडे यांनी दिली. जूट, कागदाचा लगदा, कार्ड पेपर, कपड्याचे रंग, माती, सागाचे लाकूड आदी वस्तूंपासून अक्षय डेकोरेटर्सने पर्यावरणस्नेही मखर तयार केले आहे. मंदिराच्या संकल्पनेवर मखर तयार करण्यात आले आहे. पैठणी मखरात बांबूच्या चटईचा व सात विविध रंगांतील साडीचा वापर करण्यात आला आहे. काही मखरांना कॅलिग्राफीची जोड देण्यात आली आहे. सर्व मखरे पूर्णतः नैसर्गिक वस्तूंचा वापर करून करण्यात आली आहेत. त्यामुळे ती टिकाऊ आहेत, अशी माहिती अक्षय डेकोरेटर्सचे अरुण दरेकर यांनी दिली. कलाकार गणेश म्हात्रे व रवी गिरकर यांनी मखरे साकारली आहेत. त्यांची किंमत ५५०० ते १८ हजारांपर्यंत आहे.

गेल्या वर्षी पर्यावरणस्नेही ६७ मखरे आम्ही विकली. यंदा ९० मखरे तयार केली आहेत. प्रत्येक डिझाईनमधील १० प्रकार उपलब्ध आहेत. 
- अरुण दरेकर, अक्षय डेकोरेटर्स

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year's Mumbai's Ganeshotsav is environment friendly!