प्रत्येक कृतीमागे समाजहिताची गरज

YIN
YIN

मुंबई : मोहापासून दूर राहून सामाजिक कार्याचा वसा घ्या. तुमच्या प्रत्येक कृतीमागे समाजाचे हित आणि संविधानाचे भान असले पाहिजे, असा मोलाचा सल्ला माजी न्यायमूर्ती धनंजय देशपांडे यांनी दिला. समाजकारणातून राजकारणाचे धडे गिरवण्याची सुरुवात करण्यास सज्ज असलेल्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) जिल्हाप्रमुखांच्या कार्यशाळेच्या उद्‌घाटनाच्या भाषणात समाजकारणाला संविधानाची जोड कशी द्यावी याविषयीचे बहुमोल मार्गदर्शन देशपांडे यांनी केले. समाजाच्या अंतिम कल्याणाचे उद्दिष्ट समोर ठेवून त्यासाठी कार्य करत राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यभरातील जवळपास तीन हजार महाविद्यालयांतून निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या दीडशे यिन जिल्हाप्रमुखांची कार्यशाळा शनिवारपासून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरू झाली. निवडणुकीतील अडथळ्यांचा अनुभव घेऊन इथपर्यंत पोहचलेल्या या तरुण विद्यार्थी प्रतिनिधींचा या कार्यशाळेतील उत्साह ओसंडून वाहत होता. राजकारणाबरोबरच सामाजिक नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी इथे आलेले सर्वच प्रतिनिधी उत्सुक होते.

माजी न्यायमूर्ती धनंजय देशपांडे, भाजप प्रवक्‍त्या शायना एन. सी., गायक महेश काळे, एम टीव्ही वाहिनीवरील रोडीज रघु राम यांनी यिनच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यापूर्वी अधिवेशनाचे उद्‌घाटन केले. तरुणांच्याच भाषेत वक्‍त्यांनी संवाद साधण्यास सुरुवात केल्याने जिल्हा पातळीवरून आलेले चेहरेही लगेच खुलले.

आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने आवर्जून आयोजित केलेल्या कार्यशाळेचे औचित्य साधत माजी न्या. देशपांडे यांनी सामाजिक कार्याला संविधानाची जोड देण्याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तुमच्या कर्तव्यावर मोहाचा पगडा कोणत्याही परिस्थितीत पडू देऊ नका. मोहापासून दूर राहून सामाजिक कर्तव्य करा. समाजाच्या हिताची कोणतीही एक गोष्ट सातत्याने करा. त्या प्रवाहात सातत्य ठेवा. समाजाच्या अंतिम कल्याणाचे उद्दिष्ट समोर ठेवून त्यासाठी काम करत राहा, असा सल्ला त्यांनी दिला.

यिनच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या भाजप नेत्या शायना एन. सी. या वेळीही उद्‌घाटनालाच यिन प्रतिनिधींना शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या. आजचा तरुणवर्ग हा भविष्य नाही, तर वर्तमान आहे. तुमच्या राजकारण प्रवेशाची ही सुरुवात आहे. या एका वर्षात तुम्ही कशा प्रकारे सामाजिक योगदान देणार आहात, त्यावरून तुमचे भविष्य ठरेल, असे शायना एन. सी. म्हणाल्या. राजकारणात काही घेण्यासाठी तुम्ही येऊ नका, तर देण्यासाठी या, असेही त्यांनी सांगितले. निदान यिनच्या प्रतिनिधी मंडळात मुलींसाठी 33 टक्‍के आरक्षण ठेवावे, असेही त्यांनी सुचवले. आपल्या समाजात अनेक गोष्टींसाठी झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. लहान मुले, महिला, स्वच्छता अशा कुठल्याही एका विषयावर सातत्याने काम करण्याची आवश्‍यकता आहे, असे त्या म्हणाल्या.

राजकारणात पाऊल टाकण्यासाठी आलेली ही नवी पिढी पाहून भारावून गेलेले गायक महेश काळे यांनी हे सारेच विलक्षण आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली. खूप मोठी ताकद असणाऱ्या या प्रक्रियेत थकून न जाता सातत्याने काम करा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

विरोधकांचे मत महत्त्वाचे
रोडीज्‌ फेम रघु राम यांनी काही वर्षांपूर्वी मी मतदानही केले नव्हते, असे कबूल करत राजकारणातील बारकाव्यांना मात्र हलकेच स्पर्श केला. जगात सगळीकडेच सत्ताधारी असतात; पण मला वाटतं की लोकशाही टिकते ती सत्ताधाऱ्यांमुळे नव्हे, तर विरोधकांमुळे. विरोधकांचे मत आपल्या मतापेक्षा वेगळे असले, तरी त्याचा आदर केला पाहिजे. विरोधी मत आहे म्हणजे कुणी देशद्रोही असत नाही किंवा तो या देशात राहू शकत नाही असे नाही, असे त्यांनी ठणकावून सांगत राजकारणाविषयीची भूमिका मांडली.

उद्‌घाटनापूर्वी यापूर्वीच्या मंत्रिमंडळाने कशा पद्धतीने कामे केली, जिल्हा पातळीवर निवडणुका कशा झाल्या याविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस गुजराथी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com