यशासाठी दर्जेदार वाचन आवश्‍यक - आमदार नरेंद्र पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नवी मुंबई - तरुणाईने जीवनात पुढे जाण्यासाठी दर्जेदार वाचन केले पाहिजे. लेखनही केले पाहिजे, असे मत माथाडी कामगार नेते, आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. यिनतर्फे वाशीत आयोजित यिन यूथ समर समिटच्या आज दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात समाजासाठी रचनात्मक कार्य करणाऱ्या सात तरुणांना यिन यूथ इन्स्पिरेटर्स ऍवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी नीलया एज्युकेशनचे अध्यक्ष नीलय मेहता, पनवेलमधील ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, पल्लवी अविदाचे दीपक दुबे, "साम टीव्ही'चे कार्यकारी संपादक नीलेश खरे, "सकाळ'चे सहयोगी संपादक हेमंत जुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी भटक्‍या समाजातील जात पंचायतीच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या दुर्गा गुडिले, कला व साहित्यासाठी ऐश्‍वर्या कुलकर्णी, क्रीडासाठी श्रेयश राऊत, शिक्षण क्षेत्रातील प्राची आगवणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अमित लोखंडे, युवा नेतृत्वासाठी पूनम लब्धे आणि व्यवसाय क्षेत्रासाठी मंगेश चिवटे यांना यिन यूथ इन्स्पिरेटर्स ऍवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

"सकाळ' आणि यिन युवा पिढीसाठी सुवर्णसंधी निर्माण करत आहे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

नीलेश खरे यांनी सांगितले की, भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हे वर्ष टर्निंग पॉईंट आहे. त्यामुळे योग्य करिअर निवडणे आवश्‍यक आहे.

मंगेश परुळेकर यांनी सांगितले की, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. युवा पिढीने देशाच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे.

सत्राच्या सुरुवातीला श्रीकला जोशी-बेडेकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. अलिबागच्या नटराज डान्स अकादमीच्या मुलांनी मराठी अस्मिता जपणारे व देशभक्तीपर गीतावर नृत्य केले. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

"नीलया' मोफत शिक्षण देणार
यिनच्या उपक्रमाने आपण प्रभावित झालो आहोत. या समिटमधून निवडल्या जाणाऱ्या मुलींना नीलया एज्युकेशन मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा या वेळी नीलय मेहता यांनी केली.

Web Title: YIN success reading narendra patil