करिअर बांधणीसाठी ‘यिन’चे शिबिर मार्गदर्शक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नवी मुंबई - शिक्षणाचा एक एक टप्पा पार करत असताना समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे शालेय शिक्षण सुरू असताना करिअरची दिशा ठरविणे आवश्‍यक आहे. यासाठी यिनचे हे शिबिर मार्गदर्शकच ठरेल, असा विश्‍वास महापौर जयवंत सुतार यांनी येथे व्यक्त केला. 

नवी मुंबई - शिक्षणाचा एक एक टप्पा पार करत असताना समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे शालेय शिक्षण सुरू असताना करिअरची दिशा ठरविणे आवश्‍यक आहे. यासाठी यिनचे हे शिबिर मार्गदर्शकच ठरेल, असा विश्‍वास महापौर जयवंत सुतार यांनी येथे व्यक्त केला. 

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिनतर्फे आयोजित राज्यस्तरीय तीन दिवसांच्या समर यूथ समिटचे बुधवारी (ता. १६) वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर सुतार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्‌घाटन झाले. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापालिकेचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, स्पेक्‍ट्रम अॅकॅडमीचे संस्थापक सुनील पाटील, साम टीव्हीचे संपादक नीलेश खरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पूर्वी विद्यार्थ्यांसाठी तीनच अभ्यास शाखा होत्या; आता मात्र माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारावर करियरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याचे जयवंत सुतार यांनी सांगितले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात महाविद्यालयीन दशेतच विद्यार्थ्यांनी त्यांचे लक्ष्य ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. यात मात्र अनेक अडचणी येत असून यिनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होत असल्याचा विश्‍वास संदीप नाईक यांनी व्यक्त केला. आजच्या युगातील युवक होतकरू असून, त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते काम सध्या यिन करत असल्यामुळे नक्कीच यिनच्या विद्यार्थ्यांना चांगली दिशा मिळेल, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली. 

तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी यिनने चांगला उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना ज्या विषयाची आवड आहे, तोच विषय करिअरसाठी निवडावा, असा मोलाचा सल्ला डॉ. एन. रामास्वामी यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये यिन कार्यरत असून, तीन वर्षांपासून यिनने शिबिरांचे आयोजन सुरू केले आहे. भारत देश हा उगवती महासत्ता मानली जात असून, ते आजच्या युवा पिढीमुळेच खरे होऊ शकते, असा आशावाद स्पेक्‍ट्रम अॅकॅडमीचे सुनील पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. 

विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांचा सकाळी नोंदणीसाठी अपूर्व उत्साह होता. सुरवातीला अभिनेत्री राधा सागर हिने गणेशस्तवन सादर केले. यादरम्यान महाराष्ट्र यूथ आयकॉन ॲवॉर्ड विजेती प्रियांका यादव व एकता निराधार फाउंडेशनचे संस्थापक सागर रेड्डी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आयुष्यातील खडतर प्रसंगाचे अनुभव सांगितले. कॉर्पोरेट कन्सलटन्ट कम्युनिटी डेव्हलपमेंटचे राम गुडगील यांनी अभी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र जोशी व रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तूपाल रांका यांची मुलाखत घेतली. तेजस गुजराती यांनी प्रास्ताविकात यिन उपक्रमाची माहिती दिली. नीलेश खरे यांनी आभार मानले. 

यिन-यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्डचे आज वितरण
समाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्या सात तरुणांना उद्या (ता. १७) समर यूथ समिटमध्ये ‘यूथ इन्स्पिरेटर्स ॲवॉर्ड - १८’ प्रदान करण्यात येणार आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या ॲवॉर्डसाठी नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे मुख्य प्रायोजक आहेत. नवी मुंबईतील परिषदेसाठी अरेना ॲनिमेशन पनवेल-अलिबाग, हॉटेल पल्लवी-अवीदा सहप्रायोजक आहेत. कम्युनिटी सर्व्हिस, सामाजिक सेवा, कला आणि सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी, एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप आणि उद्योग- स्टार्ट अप क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

Web Title: YIN Summer Youth Summit Guidance Camp