जवान चंदू चव्हाण लवकरच मायदेशी - सुभाष भामरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान चंदू चव्हाण लवकरच मायदेशी येतील. पाकिस्तानने दोनच दिवसांपूर्वी तसे संकेत दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज येथे दिली.

मुंबई - पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय जवान चंदू चव्हाण लवकरच मायदेशी येतील. पाकिस्तानने दोनच दिवसांपूर्वी तसे संकेत दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आज येथे दिली.

पाणतीर आणि क्षेपणास्त्रांचा मारा करू शकणाऱ्या या अत्याधुनिक पाणबुडीमुळे स्वदेशी बनावटीच्या संरक्षण साहित्यात भारताने मोठा टप्पा गाठल्याचे मानले जाते. या पाणबुडीच्या आता चाचण्या होणार असून, या वर्षाखेर ती नौदलात दाखल होण्याची शक्‍यता आहे.

फ्रान्सच्या सहकार्याने येथील माझगाव गोदीत सुरू असलेल्या "स्कॉर्पिन' पाणबुड्या बांधणीच्या प्रकल्पातील "खांदेरी' या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे भामरे यांच्या उपस्थितीत आज जलावतरण करण्यात आले.

नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा या वेळी उपस्थित होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भामरे म्हणाले, ""चंदू चव्हाण यांच्या सुटकेबाबत दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराच्या महासंचालकांशी (डीजीएमओ) सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांची तेथील सर्व चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ते लवकरच मायदेशी येतील.''

फ्रेंच कंपनीबरोबर केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतर करारानुसार "प्रोजेक्‍ट-75'मधील सर्व पाणबुड्या 2020 पर्यंत बांधून होतील.

"आयएनएस कलवरी'च्या सध्या चाचण्या सुरू आहेत. पुढील वर्षी ती नौदलाच्या सेवेत दाखल होईल. साधनसामग्री खरेदीस उशीर झाल्यामुळे तिचे सेवेत रुजू होणे लांबले, असे भामरे यांनी सांगितले. "स्कॉर्पिन' वर्गातील पाणबुड्यांची गोपनीय माहिती काही महिन्यांपूर्वी उघड झाली होती. पण, त्याचा फारसा परिणाम त्यांच्या बांधणीवर होणार नाही. उघड झालेली पाणबुडीची माहिती ही जुनी आहे. ती बांधणीच्या वेळची होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नौदलाच्या गोदीत काही दिवसांपूर्वी "आयएनएस बेटवा' ही युद्धनौका कलंडली होती. त्यात दोन जवानांचा मृत्यू, तर 14 जखमी झाले होते. त्याबाबत भामरे यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, 'युद्धनौका कलंडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्याबाबत चौकशी सुरू आहे.''

27 वर्षांनंतर पाणबुडीची बांधणी
"खांदेरी' ही अद्ययावत तंत्रज्ञान असलेली पाणबुडी आहे. तिच्या चाचण्या पूर्ण होऊन वर्षाखेर ती नौदलाच्या सेवेत दाखल होईल. नौदलात पहिली पाणबुडी सहा डिसेंबर 1968 रोजी दाखल झाली होती. ती ऑक्‍टोबर 1989 मध्ये नौदलातून निवृत्त झाली. माझगाव गोदीने "खांदेरी' या "स्कॉर्पिन' वर्गातील पाणबुडीची बांधणी 27 वर्षांनंतर केली. फ्रान्सच्या "डीसीएनएस' कंपनीच्या सहकार्याने आणि फ्रेंच कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतर करारानुसार "प्रोजेक्‍ट-75' अंतर्गत सहा स्वदेशी पाणबुड्या बांधण्यात येत आहेत. त्यापैकी पहिली "आयएनएस कलवरी' ही पाणबुडी नौदलात दाखल होणे बाकी आहे.

Web Title: Young Chandu Chavan home soon