नालासोपाऱ्यात डेंगीमुळे तरुणीचा मृत्यू 

file photo
file photo

वसई : नालासोपाऱ्यात दिवसेंदिवस डेंगीचा विळखा वाढतच असून माजी नगरसेविका अपर्णा पाटील व त्यांचा मुलगा जयेश यांना डेंगीची लागण झाल्यानंतर एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

परिसरात ऑगस्ट महिन्यात डेंगीचे दोन रुग्ण आढळले होते; तर मलेरियाचे 11 रुग्ण होते. आता सोपारा गावात पुन्हा डेंगीचे रुग्ण आढळले असून यातील शबनम ही 19 वर्षीय तरुणी डेंगीची बळी ठरली आहे. नालासोपारा येथील सोपारा गाव, रेल्वेस्थानक परिसरातील शेकडो जणांना सध्या डेंगीची लागण झाली असून अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पश्‍चिमेकडील समेळपाडा, भंडारआळी, नवयात, खरखंडी मोहल्ला या ठिकाणीही डेंगीचे रुग्ण आढळून आल्याने घबराट पसरली आहे. डास चावल्याने डेंगी होतो. पिंप तसेच भांडी तसेच टाक्‍यांमध्ये साठवून ठेवलेल्या पाण्यात डासांची पैदास होत असते. त्याचबरोबर इमारतीत काम करताना उघड्यावर ठेवलेले पाणी, वाहून येणारे पाणी तसेच करवंट्यांमध्ये साचणारे पाणी हे घातक ठरत असल्याने वसई-विरार महापालिकेच्या वतीने पाणी साठवून किंवा उघडे न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

तो वाढदिवस ठरला अखेरचा! 
शबनम हिचा 4 तारखेला वाढदिवस होता. नातेवाईकांनी एकत्र येत शबनमचा वाढदिवस साजरा केल्यानंतर अचानक तिला ताप आल्याने नजीकच्या दवाखान्यात तिच्यावर औषधोपचार सुरू केले. मात्र, पुन्हा ताप आल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला डेंगी झाल्याचे आढळले.

तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले, परंतु ती वाचली नाही. तरुण वयात तिचा मृत्यू झाल्याने कुटुंब दुःखातून अद्याप सावरलेले नाही; तर भंडारआळी येथील माजी नगरसेविका व त्यांचा मुलगा यांच्यासह अनेकांना डेंगीची लागण झाली असून, समेळपाडा भागातही डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. अशा रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सोपारा भंडारआळी व आजूबाजूच्या परिसरात डेंगीची लागण झाली असून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत गांभीर्याने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महापालिकेचे आयुक्त बळीराम जाधव यांच्याकडे केली आहे. 
- हर्षद राऊत,
माजी नगरसेवक, सोपारा 

वसई-विरार महापालिकेचे आवाहन 
घरात उघड्यावर पाणी साठवून ठेवू नये. भांडी, टाक्‍या स्वच्छ ठेवाव्यात. योग्यवेळी निदान करून उपचार घेणे. ताप आल्यास दुर्लक्ष न करता योग्य उपचार करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com