भिवंडीत डेंगीने तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून मलेरिया, टायफाईड आदींसह डेंगीसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे.

भिवंडी : भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून मलेरिया, टायफाईड आदींसह डेंगीसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. सोमवारी सकाळी शहरातील गोकुळनगर येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा डेंगीच्या तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाल भंडारी (26, रा. शंखेश्वर दर्शन बिल्डिंग) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

विशालला चार दिवसांपासून ताप येत होता. त्याला स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला डेंगीची लागण झाल्याचे तपासणीत उघड झाले होते. त्यामुळे त्याला तातडीने बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याची सोमवारी पहाटे प्राणज्योत मालवली. विशालचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. आज दुपारी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अजयनगर येथील हिंदू चिरशांती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
 
भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत 58 डेंगीचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी पाच जणांचे बळी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व अधिकारी विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांनी रोजचा कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून गटार, नाले तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने शहरात साथीचे रोग फैलावत असल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young guy died due to Dengue