मंत्रालयात नोकरीच्या प्रलोभनाने तरुणाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मंत्रालयात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून दोघा भामट्यांनी पनवेलमधील तरुणाकडून तब्बल आठ लाख ५० हजार रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई : मंत्रालयात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून दोघा भामट्यांनी पनवेलमधील तरुणाकडून तब्बल आठ लाख ५० हजार रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भामट्यांनी मंत्रालयाच्या लेटरहेडवर बनवाट कॉल लेटर आणि जॉईनिंग लेटर बनवून या तरुणाला दिल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पलिसांनी या प्रकरणातील आरोपी सागर कृष्णा भगत व प्रकाश अष्टमकर या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

तक्रारदार अजिंक्‍य प्रवीण शेडगे हा तरुण पनवेलमध्ये राहण्यास आहे. ऑगस्ट-२०१५ मध्ये अजिंक्‍यचा नातेवाईक प्रकाश अष्टमकर याने त्याची भेट सागर कृष्णा भगत याच्यासोबत घालून दिली. सागर भगतने अजिंक्‍यला मंत्रालयात लिपिकच्या जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी आठ लाख रुपये, तर शिपाईच्या जागेसाठी चार लाख रुपये लागणार असल्याचे सांगितले. अजिंक्‍यने सरकारी नोकरी मिळेल या प्रलोभनाने आठ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वेळोवेळी त्यांना दिली. मात्र, या दोघांनी आपली फसवणूक केल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man cheated by job temptation in manatralaya