
मुंबईच्या दिशेने जाणारी धावती लोकल पकडण्याच्या नादात फलाट आणि लोकलच्या फटीत पडलेल्या एका तरुणीला महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखत वाचवले. फलाटावरील सीसी टीव्हीमध्ये हे दृश्य कैद झाले आहे.
नवी मुंबई, ता. २१ (बातमीदार) : मुंबईच्या दिशेने जाणारी धावती लोकल पकडण्याच्या नादात फलाट आणि लोकलच्या फटीत पडलेल्या एका तरुणीला महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने प्रसंगावधान राखत वाचवले. फलाटावरील सीसी टीव्हीमध्ये हे दृश्य कैद झाले आहे.
बेलापूर स्थानकामध्ये मंगळवारी (ता. १९) रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. फलाट क्रमांक ३ वर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये एक तरुण व नवशानी सभन (२४) ही तरुणी चढत होते. त्याचवेळी लोकल सुटल्याने व सोबतचा तरुण लोकलमध्ये चढल्याने नवशानीनेही धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल जाऊन ती फलाट आणि लोकल दरम्यान पडली. तिचे पाय लोकलच्या फटीत जात असल्याचे पाहून तेथे कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान अजय कुमार यांनी तिच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी त्या महिलेला तेथून बाहेर ओढल्यामुळे तिचे प्राण वाचले. रेल्वे प्रशासनाने सीसी टीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर करत, प्रवाशांना धावती लोकल न पकडण्याचे आवाहन केले आहे.