टिटवाळातील तरुणाला 2 पिस्तूल, 3 जिवंत काडतुसांसह अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सापळा रचून तरुणाला वासिंद येथून अटक केली. त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

टिटवाळा : स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून एका इसमाला वासिंद येथून अटक केली. त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. अमीर शब्बीर खान (२६ ) असे या इसमाचे नाव असून, तो टिटवाळा पूर्वेकडील महागणपती रुग्णालयाजवळील वालाराम वाटिका येथे राहत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने मार्चपासूनच आचारसंहिता लागू असून, सादर काळात पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने अप्पर पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण संजयकुमार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, व्यंकट आंधळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एक इसम संशयास्पदरीत्या वासिंद पूर्व येथील दर्शन बार समोरील रेल्वे पार्किंग परिसरात वावरताना आढळला. पोलिसांना हा इसम येणार असल्याचा सुगावा लागल्याने त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा वासिंद युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, धनंजय पोरे, पोलिस उपनिरीक्षक जी.एस. सुळे त्याचबरोबर पोलिस कर्मचारी आर. व्ही चौधरी,एम .बी खोमणे,अमोल कदम,,एस.जी सोनवणे,जी.एस.पाटील,ए.आर. सपकाळ ,आर.आर. राय यांनी या तरुणाला शिताफीने पकडले. 

त्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे आढळून आली. या सर्वाची एकूण किंमत 62 हजार 100 अशी आहे. याबाबत अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: A Youth Arrested in Vasind with Pistols and Bullets