हवामान बदलाविरुद्ध तरुणांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नवी मुंबईतील तरुणाईने ‘फ्रायडेज फॉर अ फ्युचर इंडिया’ या संस्थेअंतर्गत हवामान बदलाविरुद्ध शांततेच्या मार्गाने चळवळ सुरू केली आहे. संस्थेअंतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन हवामान बदल, जागतिक तापमानवाढीविषयी माहितीपर कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

मुंबई : जागतिक तापमानवाढीला आळा घालण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यासाठी जनजागृती करत आहे. मागील वर्षी स्वीडनमधील ग्रेटा नावाच्या १६ वर्षीय शाळकरी मुलीने जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी राजकारण्यांनी ठोस पावले उचलावीत, या मागणीसाठी शाळेत न जाण्याचे ठरविले. तिच्या या मोहिमेला पाठिंबा देत जगातील अनेक विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळा बंद मोहीम सुरू केली. ग्रेटाला ही चळवळ सुरू करण्यासाठी ‘ग्लोबल ह्युमन राईट्‌स’ अवॉर्डने गौरवण्यात आले होते. 

याच धर्तीवर नवी मुंबईतील तरुणाईने ‘फ्रायडेज फॉर अ फ्युचर इंडिया’ या संस्थेअंतर्गत हवामान बदलाविरुद्ध शांततेच्या मार्गाने चळवळ सुरू केली आहे. संस्थेअंतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन हवामान बदल, जागतिक तापमानवाढीविषयी माहितीपर कार्यशाळांचे आयोजन केले जाते. मार्च २०१९ मध्ये सुरू झालेल्या या चळवळीमध्ये नवी मुंबईतील विविध महाविद्यालयातील तरुण-तरुणी दर शुक्रवारी रेल्वेस्थानकावर एकत्र जमतात व हवामान बदलाविरुद्ध माहिती देणारे फलक, बॅनर घेऊन जनजागृती करतात. वाशी रेल्वेस्थानकावर सुरू झालेली ही चळवळ आता मुंबई, ठाण्यामध्येदेखील पसरली आहे. 

आयपीसीसीच्या निकर्षानुसार २०२० ते २०५० दरम्यान हवामानबदलांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दरवर्षी जवळपास अडीच लाख असणार आहे. सध्या हवामान बदलाचे अनेक दुष्परिणाम आपण भोगत आहोत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चळवळीचा भाग म्हणून आमची सरकारकडे मागणी आहे की, जागतिक तापमानवाढ थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. 
- समीक्षा लोहार, सदस्य, फ्रायडेज फॉर अ फ्युचर इंडिया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Campaign Against Climate Change