तुर्भेत तरुणाची आत्महत्या ; चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

अरुण तुर्भेत मित्रांसमवेत राहत होता. एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून तो काम करायचा. शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास सहकारी झोपेतून उठल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.

नवी मुंबई : तुर्भे सेक्‍टर 20 भागातील अरुण जगन्नाथ भडाळे (वय 25) या तरुणाने शनिवारी सकाळी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. 

अरुण तुर्भेत मित्रांसमवेत राहत होता. एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून तो काम करायचा. शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास सहकारी झोपेतून उठल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अरुणचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासणीत अरुणने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली नव्हती.

दुपारी अरुणच्या कोपरखैरणेत राहणाऱ्या आतेभावाने पोलिसांना चिठ्ठी आणून दिली. त्यात कर्जामुळे झालेल्या फसवणुकीचा उल्लेख करतानाच फडणवीस सरकार आम्हाला आरक्षण देऊ शकत नसल्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हटले आहे. तसेच फसवणूक करणाऱ्यांची नावे व फोन नंबरदेखील नमूद केले आहेत. 

चिठ्ठीतील हस्ताक्षराची तपासणी करणार 

अरुणच्या आतेभावाने दुपारी अरुणची पिशवी आपल्याकडे असल्याचे तसेच त्यात त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडल्याची माहिती पोलिसांना दिली; मात्र अरुणची आत्महत्या तुर्भेमध्ये झाली असताना, त्याची चिठ्ठी कोपरखैरणेत मिळाल्याने ती चिठ्ठी त्यानेच लिहिली आहे का, याची खातरजमा करण्यासाठी चिठ्ठीतील हस्ताक्षराची तपासणी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले.  

Web Title: Youth commits suicide in turbhe