...म्हणून 'तो' करणार एकाच वेळी दोघींशी विवाह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पत्रिकेमध्ये एक वर व दोन वधूंची नावे आहेत. यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

पालघर: सोशल मीडियावर सध्या एका पत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण, या पत्रिकेमध्ये एक वर व दोन वधूंची नावे आहेत. यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, याची अनेकांना उत्सुकता लागली असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. परंतु, खरे कारण नेमके काय आहे? हे अनेकांना समजत नव्हते.

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा सुतारपाडा गावात राहणाऱ्या संजय धाडगा हा युवक एकाच मांडवात दोन वधूंशी विवाह करणार आहे. विवाहाची त्यांनी पत्रिका तयार केली असून, नातेवाईकांना त्याचे वाटप केले आहे. 22 एप्रिल 2019 रोजी हा अनोखा विवाहसोहळा पार पडणार आहे. मात्र, या विवाहाच्या पत्रिकेचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर नेटिझन्सनी व्हायरल केले आहे. विवाहाची पत्रिका व्हायरल झाल्यापासून चर्चांना उधान आले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संजय हे रिक्षाचालक आहेत. संजयचे 10 वर्षांपूर्वी बेबी नावाच्या एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. दोघे एकत्र राहून संसार करु लागले. त्यानंतर काही वर्षांनंतर संजयचे पुन्हा रिना नावाच्या एका मुलीवर प्रेम जडले. त्यानंतर संजय, रीना आणि बेबी हे तिघेजण विवाह न करता एकाच घरात राहू लागले. सध्या बेबीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ये असून, रीनाला एक मुलगी आहे. पालघरमधल्या अनेक आदिवासी वस्त्यांमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जोडपी विवाह न करताच संसार करतात. अनेक जोडपी उतारवयात विवाह करतात, तर काहीजण मुले झाल्यानंतर विवाह करतात. संजयला परिस्थितीमुळे 8-10 वर्षांपूर्वी विवाह करता आले नाही. त्यामुळे त्याने आता विवाह करण्याचा निर्णय घेतला असून, पत्रिका छापली आहे. त्याच्या कुटुंबियामध्ये विवाहाची तयारी सुरू आहे.

Web Title: youth getting married with two women at palghar wedding card viral