तरुणांना हवी जास्त पगाराची सहचारिणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

मुंबईतील १७ ते २१ वर्षे वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे! विद्यार्थिनींनी देखणा आणि आपल्यापेक्षा जास्त पगाराचा जोडीदार हवा, अशी भूमिका  कायम ठेवली. 

मुंबई - आकर्षक दिसणारी जोडीदार हवी, आपल्यापेक्षा जास्त पगार असल्यास आणखी चांगले; हा पैसा कुटुंबातच येईल, हे ‘हिशेबी’ नवमत आहे मुंबईतील १७ ते २१ वर्षे वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे! विद्यार्थिनींनी देखणा आणि आपल्यापेक्षा जास्त पगाराचा जोडीदार हवा, अशी भूमिका  कायम ठेवली. 

महाविद्यालयीन वयात स्त्री-पुरुष समानतेचा विचार दृढ करण्यासाठी राज्य महिला आयोग आणि ‘अक्षरा’ या संस्थेने मुंबईतील १६ महाविद्यालयांत युवक-युवती मेळावे घेतले. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची एकमेकांबद्दलची मते जाणून घेण्यात आली. पुरुष रडत नाही... रडल्यास त्याला हिणवले जाते; त्यामुळे अनेक वेळा त्याला स्वत:च्या भावना व्यक्त करता येत नाहीत, अशी खंत मुलांनी व्यक्त केली.

लक्ष वेधून घेण्यासाठी सौंदर्यप्रसाधने वापरतो, असे तरुणींनी सांगितले; तर बौद्धिक क्षमतेपेक्षा आकर्षक दिसणाऱ्या मुलीच आवडतात, अशी कबुली तरुणांनी दिली. किशोरवयात सौंदर्याच्या व्याख्या वेगळ्या असतात, असे मुलांनी ‘सुंदरता का राज’ या चर्चासत्रात सांगितले. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या अनेक महिला सौंदर्यांच्या प्रचलित चौकटीत बसत नाहीत, याकडे ‘अक्षरा’ संस्थेच्या सदस्यांनी लक्ष वेधले. हा मुद्दा मुलांनी मान्य केला, असे या संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी स्नेहल वेळकर म्हणाल्या. 

सहभागी महाविद्यालये 
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, भांडुपमधील व्ही. जे. कृष्णा कॉलेज आणि रामानंद आर्या महाविद्यालय, घाटकोपरमधील झुनझुनवाला महाविद्यालय, शीवमधील एसआयईएस कॉलेज, एसआयईएस कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्‍स, चेंबूरमधील श्री नारायण गुरू महाविद्यालय, अंधेरीतील भवन्स महाविद्यालय, सांताक्रूझचे एल. एस. रहेजा महाविद्यालय, विलेपार्लेतील डहाणूकर महाविद्यालय, मुंबई सेंट्रलमधील महाराष्ट्र महाविद्यालय, ग्रॅंट रोडमधील अकबर पीरभॉय कॉलेज, ताडदेवमधील एनएसएस महाविद्यालय, परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालय, फोर्टचे इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स आणि वांद्र्यातील रिझवी महाविद्यालय.

...तर कानाखाली खाल!
मुलींना किशोरवयीन वयात अनेकदा छेडछाडीला सामोरे जावे लागते. असे प्रकार सहन करण्याचा जमाना गेला; आता अंगाशी याल, तर कानाखाली खाल, अशी समज मुलींनी दिली. मुलांनीही आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

ऑफिसची वेळ चुकली... 
‘समानता की दौड’ या खेळात तरुण आणि तरुणींना घरातील कामे करून वेळेत कार्यालयात पोहोचायचे होते. नोकरदार महिला करत असलेल्या कामांची जबाबदारी मुलींवर सोपवण्यात आली होती आणि मुलांना किरकोळ कामे देण्यात आली होती. किरकोळ कामे आटोपून मुलांनी वेळेत कार्यालय गाठले; मात्र मुलींचा ‘लेट मार्क’ झाला. हे लक्षात आल्यावर मुलांनी ‘घरातील कामांत जोडीदाराला मदत करू’ अशी ग्वाही दिली.

Web Title: Youth in Mumbai desires life partner with higher income says a Survey