उल्हासनगरात कैची खुपसून तरुणाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी कैची खुपसून जिन्स पॅंट कटिंग करणाऱ्या टेलरचा बळी घेतला आहे.

उल्हासनगर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी कैची खुपसून जिन्स पॅंट कटिंग करणाऱ्या टेलरचा बळी घेतल्याची घटना मंगळवारी (ता. 22) रात्रीच्या सुमारास उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

कॅम्प 5 ओटी सेक्‍शनमधील बॅरेक क्र. 1965 मध्ये कमलेश कुकरेजा यांचा जिन्स पॅंट कापण्याचा व्यवसाय असून, त्यात दिलीप कुशवाह हा कटिंग मास्टर म्हणून काम करत होता. त्यांच्या गाळ्याच्या कम्पाऊंडमध्ये बसून व्यसन करणाऱ्यांना दिलीप विरोध करत होता. मंगळवारी रात्री चार तरुण नशा करण्यासाठी कम्पाऊंडमध्ये बसल्यावर दिलीपने त्यांना मज्जाव केला. त्यावरून झालेल्या भांडणात एकाने दिलीपच्या शरीरात कैची खुपसली. यात दिलीपचा मृत्यू झाला.

दिलीपचा नोकर शिवनारायण मौर्या हा आरोपींना ओळखत असल्याने त्याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपी सोनू चौगुले याला बेड्या ठोकल्या असून त्याच्यासोबत असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मोहन खांदारे करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth murdered by scissors in Ulhasnagar