ऐन पुरात शेतकऱ्यांना तरुणांचा मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

वाड्यात तिघांच्या धाडसाचे कौतुक; तराफ्यावरून केली 25 जणांची सुटका 

वाडा ः वाडा तालुक्‍याला मुसळधार पावसाने झोडपल्याने पाहता पाहता महापुराने गावे पाण्याखाली गेली. वैतरणा नदीने रौद्ररूप धारण केले. धोक्‍याची पातळी उलटून नदीचे पाणी बोरांडा गावात घुसले. पलाटपाडा येथे शेतीच्या कामासाठी गेलेले बोरांडा गावातील सुमारे 25 शेतकरी आणि शेतमजूरही पुरात अडकून पडले. त्यांची तराफ्यावरून आलेल्या तरुणांनी जीवाची बाजी लावून सुखरूप सुटका केली. 

वाडा तालुक्‍यातील बोरांडा या गावापासून तीन कि.मी.वर वैतरणा नदीजवळ पलाटपाडा आहे. या पाड्याच्या परिसरात साधारणपणे 25 च्या आसपास शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. पप्या पवार, रमेश वाघे, राहुल पाटील या तीन तरुणांना हे समजताच तिघे तपाफ्यावरून तिकडे पोहोचले.

पाण्यात असताना अनेकदा तराफ्यावर साप येत होते. त्यांना न घाबरता, विचलित न होता तरुणांनी त्यांना बाजूला सारून आपले काम सुरूच ठेवले. त्यांनी तराफ्यावरून एका वेळेस तीन ते चार नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू ठेवून काही तासांत 25 नागरिकांनी सुटका केली. 

400 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य गेले वाहून 
पिंजाळी नदीने धोक्‍याची पातळी ओळांडून नदीकाठच्या अनेकांचे संसार वाहून नेलेच; पण या नदीकाठी पाली येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सरकारी आश्रमशाळेतील इमारतींमध्ये पिंजाळी नदीच्या पुराचे 10 दहा फूट पाणी शिरल्याने येथील 400 विद्यार्थ्यांचे कपड्यांसह शैक्षणिक साहित्य वाहून गेले. विद्यार्थ्यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याने संभाव्य धोका टळला. 
दरम्यान येथील सर्वच वर्गखोल्यांमध्ये पुराच्या पाण्यात आलेली घाण, गाळ, साप अडकले असल्याने विद्यार्थ्यांना 10 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth rescue 25 farmers in flood at Wada near Mumbai.