ठाण्यात चिमुकल्यांसाठी झकास बसस्टॉप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 September 2019

शाळेत जाताना मुलांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन, स्ट्रॉबेरी, पॉपकॉर्न टब, पेन्सिल रबर, फुलपाखरू अशी प्रतिकृती असलेले बस थांबे तयार करण्यात आले आहेत. 

ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन, स्ट्रॉबेरी, पॉपकॉर्न टब, पेन्सिल रबर, फुलपाखरू अशी प्रतिकृती असलेले बस थांबे तयार करण्यात आले आहेत. 

ठाण्याच्या वर्तकनगर, विजयनगर, दोस्ती विहार, कोरस नक्षत्र, रुणवाल प्लाझा, यशोधननगर, डवलेनगर या भागांतील शालेय विद्यार्थ्यांची मुख्य रस्त्यांवर शालेय बसेसची वाट पाहताना प्रचंड गैरसोय होत असे. या भागात असलेल्या अरुंद गल्ल्या, दुतर्फा पार्किंग आदींमुळे शालेय बसेस विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावर सोडून निघून जात होत्या. मुलांची होणारी ही गैरसोय काहीशी कमी करण्यासाठी तसेच बस थांब्यावर मुलांचे थांबणे मनोरंजक व्हावे, यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी ठाण्यात शाळकरी मुलांसाठी ‘चिल्ड्रन बस शेल्टर’ उभारण्याची मागणी ठाणे पालिका प्रशासनाकडे केली होती. 

दोस्ती विहार संकुल, कोरस नक्षत्र, रुणवाल प्लाझा येथे हे बस थांबे उभारण्यात आले आहेत. या बस थांब्यांचे अनावरण शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, कांचन चिंदरकर यांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण सात ठिकाणी हे बस थांबे उभारण्यात येणार असून या थांब्यांमुळे मुले न कंटाळता बसची वाट पहात खेळत-खेळत शाळेत जातील, असा विश्‍वास या वेळी पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. 

देशातील प्रगत शहरात अशा बस थांब्यांची प्रतिकृती पाहिल्याने ठाण्यातही असे थांबे असावे, या विचारातून ही संकल्पना येथे राबविली. या थांब्यांचा प्रकल्प मुंबई महापालिका प्रशासनानेही मागविला असून ठाणे पालिकेच्या या प्रकल्पाचे मुंबईतही अनावरण केले जाईल.
- पूर्वेश सरनाईक, 
नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zakas Busstop for brunches in Thane