esakal | Video : लाइफस्टाइल कोच : लॉकडाउनमधील वेटलॉससाठी पाच उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

Weightloss

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच असंर्सजन्य आजार ‘कोव्हिड १९’ने ग्रस्त असणाऱ्यांची प्रकृती गंभीर होण्यासाठी धोकादायक (रिस्क फॅक्टर्स) असल्याचे अधोरेखित केले आहे. उदा. उच्च रक्तदाब, कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना या संसर्गजन्य आजाराचा अधिक धोका आहे.

Video : लाइफस्टाइल कोच : लॉकडाउनमधील वेटलॉससाठी पाच उपाय

sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच असंर्सजन्य आजार ‘कोव्हिड १९’ने ग्रस्त असणाऱ्यांची प्रकृती गंभीर होण्यासाठी धोकादायक (रिस्क फॅक्टर्स) असल्याचे अधोरेखित केले आहे. उदा. उच्च रक्तदाब, कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना या संसर्गजन्य आजाराचा अधिक धोका आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतेक रिस्क फॅक्टर्स लठ्ठपणाशी संबंधित आहेत. त्यामुळेच आपण त्यांचे नियमन करण्याची गरज आहे. नेहमीचे वैद्यकीय उपचार घेतानाच लठ्ठपणाचा सामना करायला हवा. लठ्ठपणा कमी करण्यामधील पाच महत्त्वाचे अडथळे आपण गेल्यावेळी पाहिले.
१. पार्ट्या 
२. प्रवास
३. फास्ट फूडची उपलब्धतता
४. व्यायाम न करणे.
५. अपुरी झोप

तथापि, सध्याच्या लॉकडाउनमुळे हे सर्व अडथळे दूर झालेत. त्यामुळे, स्वत:च्या आरोग्यासाठी काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. चला ती वापरूया. स्वत:ला लॉकडाउननंतरच्या सुंदर आयुष्यासाठी तयार करूयात, कारण कोरोनानंतरचे आयुष्य वेगळेच असेल. वजन घटविण्यासाठी खालील पाच ‘गोल्डन टिप्स’ अंमलात आणा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आतड्याचे आरोग्य
तुमच्या आतड्याच्या आरोग्याचा वजन कमी होण्यावर मोठा परिणाम होतो. तुमच्या पचनसंस्थेच्या कार्यक्षमतेची वजन नियंत्रित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. चांगले पचन, आहारातील पोषक घटकांचे व्यवस्थित शोषण आणि आतडयाचे आरोग्य वजन नियंत्रित करण्यात महत्त्वाचे ठरते. निरोगी पचनसंस्थेसाठी आंबवलेले पदार्थ अधिक खावेत. आहारात दह्याचा वापर वाढवा. ओवा आणि जिऱ्याचे पाणी पचनसाठी उपयुक्त आहे. 

मध्यम प्रमाणातील व्यायाम
दररोजचा मध्यम प्रमाणातील व्यायाम वजन निंयत्रित राहण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. दररोज पाऊण ते एक तास व्यायाम करा. सकाळी उठल्यानंतर दैनंदिन कामे सुरू करण्यापूर्वी व्ययाम करणे अधिक श्रेयस्कर. सध्याच्या कठीण परिस्थितीत आपण झाडणे, पुसणे, साफसफाईसारख्या घरातील कामांतूनही शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहू शकतो. तुम्हाला घरामध्ये कोणते व्यायाम करावेत, हे यू-ट्यूबवरही सर्च करू शकता. व्यायामामध्ये कॉर्डिओ, ताकद वाढविणारे, योग, प्राणायाम आदींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता श्वसनाचे आणि छातीचे प्रसरण करणारे व्यायामही महत्त्वाचे आहेत. 

पुरेशी झोप
आपल्या ‘बिझी’ जीवनशैलीमुळे आपण झोपेच्या नैसर्गिक चक्रांना फारच थोडी मदत करू शकतो. मात्र, सध्या आपण घरी असल्याने झोपेचे संतुलन साधू शकतो. हार्मोन्सचे असंतुलन टाळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तसेच एकूणच आरोग्यासाठी दररोजची सात ते आठ तासांची शांत झोप महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे, आपण दररोज झोपण्या-उठण्याची वेळ ठरविली, तर त्याचेही आपल्याला अतिरिक्त फायदे मिळतात. 

पुरेसे पाणी पिणे
पाण्याची खालील बाबतीत महत्त्वाची भूमिका असते.
    पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन पोचवणे.
    शरीराच्या प्रत्येक पेशीला खनिजे आणि पोषक घटक उपलब्ध करून देणे. 
    शरीरातून विषारी घटक काढणे.
    शरीराचे तापमान संतुलित ठेवणे.
पुरेसे पाणी किंवा ग्रीन टी, हळद आणि काळीमिरीचा चहा, आलेपाणी, लिंबू सरबत, आवळा सरबत, पालक सूप, ताक यांचे सेवन करून स्वत:ला हायड्रेट ठेवा. दररोज तीनचार लिटर पाणी प्यावे.  

आहारनियंत्रण
तुमच्या दैनंदिन आहारात सातत्य आणण्यासाठी ही वेळ योग्य आहे. कधी, किती आणि काय खावे हे नियंत्रित केल्यामुळे तुमच्या शरीराला त्याप्रमाणे खाण्याची सवय लागते. यामुळे तुम्हाला इतर वेळी भूकही लागल्यासारखेही वाटणार नाही. सध्या प्रत्येकजण घरी असल्यामुळे अनेकजणांचा विविध खाद्यपदार्थ करण्याकडे व अतिखाण्याकडेही कल वाढतोय. त्यामुळे, सहजसाधे भारतीय पदार्थ तयार करा आणि संतुलित, सकस आहार घ्या. आहारात अंडी, मोड आलेली धान्ये (स्प्राऊट), दाळीसारख्या प्रथिनांच्या स्रोतांचा समावेश करा.

तुम्ही तुमच्या पोटाचे चार काल्पनिक भाग करा. त्यापैकी दोन भाग कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, फॅट्‌स आदी घटकांनी भरा. घरातच बनविलेल्या संतुलित आहारातून हे साध्य करता येऊ शकते. एक भाग पाणी तसेच आरोग्यदायी द्रव पदार्थांनी भरा. उर्वरित एक रिकामाच ठेवा. हे पाच उपाय अमलात आणा. शिस्तबद्ध व्हा. आहारात सातत्य ठेवा. नियमित व्यायाम करा. यातून तुमच्या आरोग्याचा पाया घातला जाईल.