‘लेबल’लावण्याची  कला !

Label
Label

आपण बाजारातून वस्तू विकत आणतो. पूर्वी बहुसंख्य वस्तू मोकळ्याढाकळ्या असायच्या. विकत घेतल्यानंतर त्या वेष्टनात  बांधून दिल्या जायच्या. काळ बदलला, आता बहुसंख्य वस्तू ‘पॅकिंग’ केलेल्या असतात आणि आत काय आहे हे कळण्यासाठी त्यावर ‘लेबल’ लावलं जातं.

माणसांबद्दल देखील असंच आहे.  पूर्वी बहुसंख्य माणसं मोकळीढाकळी असायची. आता ‘पॅकिंग’ केल्याप्रमाणं असतात. फरक फक्त एवढाच आहे, वस्तूंवर ‘लेबल’ लावलेलं असतं आणि माणसांवर आपण ‘लेबल’ लावतो! योग्य ‘लेबल’ लावता येणं ही देखील कला आहे !!! कारण त्यात चूक झाल्यास नात्यावर, कामावर, घटनांवर परिणाम होतो. 

उदाहरणार्थ...ऑफिसमध्ये काम करताना चुका करणाऱ्या एखाद्या  व्यक्तीला ‘तो मूर्ख आहे!’  हे लेबल सरसकट लावलं जातं. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी तीच व्यक्ती योग्य मार्ग सुचवते. म्हणजेच, त्याला सरसकटपणे लावलेलं, मूर्खपणाचं लेबल चुकीचं होतं. बंद पडलेलं घड्याळ देखील दिवसातून दोनदा बरोबर असतंच! त्यामुळं ‘तो मूर्ख आहे!’ याऐवजी हेच वेगळ्या शब्दात मांडताना म्हणायला हवं. त्याच्या हातून चुका होतात!’ 

शब्दांची सकारात्मक निवड, व्यक्तीला सुधारण्याची संधी देते. व्यक्ती आणि व्यक्तीची कृती यात फरक न केल्यास गल्लत होते. खालील दोन वाक्यातून व्यक्ती आणि कृती यामध्ये फरक कसा करायचा हे लक्षात येईल.

‘मी घाबरट आहे,’ याऐवजी ‘मला या गोष्टीची भीती वाटते’.

...सापाची भीती वाटणारी आई, बाळाजवळ साप जाताना पाहते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता सापाच्या शेपटीला धरून लांब फेकून देते. म्हणजेच सरसकट घाबरट आहे, असं लावलेलं ‘लेबल’ चुकीचं होतं. एखाद्या विद्यार्थ्याला ‘तो अयशस्वी आहे,’ असं म्हणण्याऐवजी ‘त्याला या परीक्षेत कमी मार्क मिळाले,’ हे म्हणणं योग्य! शाळेमध्ये कमी मार्क मिळालेली एखादा मुलगा भावी काळात अत्यंत यशस्वी होते. म्हणजेच, त्याला लावलेलं सरसकट ‘लेबल’ चुकीचं होतं. ‘तो खूप कंजूष आहे,’ असं म्हणण्याऐवजी ‘तो काटकसरी आहे,’ हे म्हणणं चांगलं! कमी खर्च करणारी एखादी व्यक्ती, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात लाखो रुपयांची देणगी देते. म्हणजे, त्याला कंजूष असं सरसकट लावलेले ‘लेबल’ चुकीचं होतं. 

आपला लोकांशी संबंध येतो. नव्यानं ओळखी तयार होत असताना, एखाद्या प्रसंगावर आधारित सरसकट त्या व्यक्तीचं मूल्यांकन केलं गेलं, ‘लेबल’ लावलं गेलं, तर कायमस्वरूपी त्याला त्याच नजरेतून पाहिलं जातं. मग लोकं एखाद्याबद्दल बोलतात ‘ती रागीट आहे’, ‘तो आळशी आहे,’ असे उद्‍गार काढत राहतात. इतरांनाच काय, आपण स्वतःलाही ‘लेबल’ लावत असतो. नैराश्यवादी नजरेतून लावलेले हे ‘ लेबल’ वारंवार बोललं गेल्यास मनात नवं  नैराश्य निर्माण होतं. मन खचतं. ही लोकं ‘मी असाच आहे. आता स्वभावात  काही बदल होणार नाही,’ असं सांगत राहतात. यावर मात करण्यासाठी शब्दरचना बदला, त्रयस्थपणे पाहा, मोकळेपणाने पहा. त्यात बदल करा. असं केल्यास जगण्याचं ‘पॅकिंग’ सुंदर होईल!...विश्वासानं स्वत:त बदल केला, तर बदलावर विश्वास बसू शकतो!!!

(लेखक एकपात्री कलाकार व लाफ्टर योगा ट्रेनर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com