मानसिक आरोग्याविषयी पुरेशी जागरुकता नाही

raja aakash.jpg
raja aakash.jpg

भारतात अजूनही मानसिक आरोग्याविषयी पुरेशी जागरुकता नाही. मुळातच कुठलाही त्रास नसताना डॉक्‍टरकडे जाणे ही कल्पनाच लोकांना मानवत नाही. त्यामुळे कर्करोग किंवा हृदयविकारासारखे मोठे आजार खूप बळावल्यावरच लोक डॉक्‍टरकडे पोहोचतात. शारीरिक आजारांबद्दलच ही स्थिती असताना मानसिक स्वरुपाचे आजार असू शकतात, हेच लोकांना पटत नाही. कधी तरी परिस्थिती खूप हाताबाहेर गेल्यावर मग कळते की हा मानसिक आजार आहे, पण तरीही त्यावर उपचार होऊ शकतो आणि त्यासाठी आपण मानसशास्त्रज्ञाकडे गेले पाहिजे, हे अजूनही लोकांच्या पचनी पडत नाही.

अलिकडच्या जीवनशैलीत तर मानसिक तणाव प्रचंड वाढतो आहे. स्वत:ला सिद्ध करण्याची न संपणारी स्पर्धा, कामाचे वाढलेले तास आणि ताण, विभक्‍त कुटुंबपद्धती. शेजारसंबंध संपलेले. सार्वजनिक जीवन नसल्यासारखे. सगळी नाती खूप फॉर्मल. यामुळे दिवसेंदिवस माणूस एकटा होत चालला आहे. माणसामाणसातला संवाद संपत चाललाय. परिणामी मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशावेळी तंत्रज्ञानाने माणसाला एकटेपण घालवण्याचा नवा मार्ग मिळवून दिला आहे, तो आहे सोशल मीडियाचा आणि हातात दिले आहे एक चोवीस तास साथ देणारे खेळणे. सेलफोनचे. माणूस त्यामध्ये आपले एकटेपण विसरू पाहतो. पण हे खेळणे फसवे आहे. यामुळे एकटेपणा संपत नाही, तर माणूस अधिक एकलकोंडा होत जातो.

माणूस आपली व्यक्‍त होण्याची भूक सोशल मीडियावर भागवत असतो. मात्र, हा वन वे ट्रॅफिक आहे. सोशल मीडियावर तुम्हाला सच्चा प्रतिक्रिया मिळतीलच, याची खात्री नसते. हे आभासी जग आहे, त्यातून बाहेर पडले की एकाकीपणा अधिकच मानगुटीवर बसतो. परिणामी माणूस संतापी होतो किंवा नैराश्‍यात जातो. मग व्यसन, आत्महत्या, हत्या असे परिणाम दिसू लागतात.

युवकांची स्थिती तर अधिकच वाईट आहे. या पिढीला नाही ऐकण्याची सवयच उरली नाही. बालवयापासूनच यांच्यासमोर सगळी सुखे हात जोडून उभी असतात. संघर्ष त्यांना माहितीच नाही. सगळ्या ऐहिक गोष्टी मुबलक आहे. कमतरता असते ती भावनिक ओलाव्याची. त्यामुळे तरुण पिढी भावनाशून्य होत चालली आहे. अपयश, पराभव, अपमान ते पचवू शकत नाहीत. नैराश्‍यात जातात. त्यातून कधीतरी चुकीच्या मार्गाला लागतात. आत्महत्येचा मार्ग निवडतात. कारण संवाद हरवत चालला आहे.

हे टाळायचे असेल तर...
* परस्पर संवाद साधला जावा.
* कुटुंबातल्या सगळ्यांनी एक दिवस ठरवून सोशल मीडियाचा उपवास करावा.
*दिवसातून एकदा तरी एकत्र जेवावे. जेणेकरून गप्पा होतील आणि दिवसभरातील घडामोडी कुटुंबियांशी शेअर होतील.
* जीवाभावाचे मित्र असावेत. ज्यांच्याजवळ मन मोकळे करता येईल.
* दिवसातला काही वेळ फक्‍त स्वत:साठी असावा. त्यावेळी आवडते पुस्तक वाचावे, संगीत ऐकावे.
* झोपण्यापूर्वी दिवसभरातील घटनांचा आढावा घ्यावा. अंतर्मुख होऊन आपल्या वागण्याचे विश्‍लेषण करावे.
* आपल्या दिसण्याची,कपड्यांची आपण जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी आपण आपल्या मनाचीही घ्यावी.
* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यातला आनंद शोधावा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com