चेतना तरंग :  औपचारिकता, अनौपचारिकता

Sri-Sri-ravishankar
Sri-Sri-ravishankar

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

तुम्ही समाजातून औपचारिकता वगळू शकत नाही. औपचारिकतेतून संवाद साधता येतो. संवाद साधण्यासाठी दोघे हवेतच. म्हणजेच औपचारिकता द्वैत प्रस्थापित करते. हार्दिकता एकत्वाचा भाव वाढविते. हार्दिकतेशिवाय औपचारिकता ढोंग ठरेल आणि बेदरकार वाटेल.

संस्थात्मक व्यवस्था औपचारिकतेवर आधारित असते. औपचारिकता सोडल्यास संस्था सुरू होऊ शकणार नाही किंवा तिच्यात सुसंबद्धता येणार नाही. औपचारिकतेची जाणीवपूर्वक टाकलेली पावले म्हणजेच तुमच्या सर्व कार्यांची आखणी असते. हार्दिकता हा आपला स्वभाव आहे. आपल्या अस्तित्वाचा जणू गाभाच. औपचारिकता वरवरचे आवरण आहे. आवरण दिव्याच्या आच्छादनाप्रमाणे पारदर्शी असल्यास आतील प्रकाश दूरवर पसरेल, पण तेच जाड, अपारदर्शी असल्यास दिसणार नाही. प्रेम आणि ज्ञान यांचे मूळ हार्दिकतेतच आहे. त्यांना बहरण्यासाठी अनौपचारिक आणि हृदय वातावरण हवे. भक्ती अनौपचारिक आहे, कुठल्याही शिस्तीत न बसणारी. म्हणून हार्दिक औपचारिकता आणि औपचारिक हृद्यता याचा मेळ घालावा.

स्वावलंबन - परावलंबन
आपले शरीर संपूर्ण सृष्टीवर अवलंबून आहे. समाजात कुणाला कपडे शिवावे लागतात, वीजनिर्मिती करावी लागते, खाणीतून तेल काढावे लागते. शरीर या जगापासून स्वतंत्र होऊ शकत नाही. शरीराला परावलंबन आवश्यक आहे. आत्मा शरीराशी ओळख सांगतो, तेव्हा त्याला टोचणी लागते आणि तो स्वावलंबनाचा शोध घेऊ लागतो. मन, बुद्धी, अहंकार हे सर्व स्वावलंबनाचा शोध घेतात. स्वावलंबनाचा शोध घेताना तुम्ही नेहमी अहंकारात अडकता आणि जास्तच दुःखी होता. बहुतेक लोकांना त्यांच्या परावलंबनाची जाणीव नसते. त्यांना मर्यादेची आणि परावलंबित्वाची जाणीव झाल्यावर स्वावलंबनाची इच्छा निर्माण होते. तुमच्यात अंतर्गत हालचाल सुरू होत नाही, तोपर्यंत स्वावलंबित्व मिळवणे शक्य नाही. त्यानंतरच तुम्हाला आपण परस्परावलंबी असल्याचा शोध लागतो. प्रत्येक आत्मा-जीव परस्परावलंबी आहे. प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला हे माहीत असते, की प्रत्येक गोष्ट परस्परावलंबी आहे. स्वावलंबन अशी काही गोष्ट नाहीच.

एका स्तरावर परावलंबित्व हे कठोर सत्य आहे. दुसऱ्या स्तरावर तो एक भास आहे, कारण आत्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. जेव्हा तुम्हाला एकतेची आणि आपलेपणाची भावना नसते तेव्हा तुम्हाला स्वावलंबित्व हवे असते. आत्मा अद्वैत असल्यामुळे स्वावलंबित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही. स्वावलंबित्वाची मागणी करणारा भिकारी व स्वावलंबित्व भास मानणारा राजा आहे. आपलेपणाची भावना नीट रुजली नसल्यास साधकाच्या जीवनात अस्थिरता येते. मग अहंकार पुन्हा न्यूनत्वाकडे येण्यासाठी कारणे शोधू लागतो.

तो अजूनही ज्ञानाच्या पूर्णत्वात बुडालेला नाही. मनाला अजून त्याची सवय नसल्याने तो अहंकाराकडे परत येण्यासाठी आणि एकटा,   स्वावलंबी आणि वेगळा राहण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधू लागतो. अगदी लहानसे दोष शोधून त्यांचे उदात्तीकरण करतो. या प्रवृत्तीबद्दल सजग राहा आणि काहीही झाले तरी सर्व शक्तीनिशी सत्संगाशी आणि या मार्गाशी बांधील राहा.

प्रश्न - स्वसमर्थतेबद्दल काय?
गुरुदेव - आत्मा समर्थ आणि कार्यक्षम आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com