esakal | चेतना तरंग : माफी मागण्याची चूक करणे चांगले!
sakal

बोलून बातमी शोधा

चेतना तरंग : माफी मागण्याची चूक करणे चांगले!

चेतना तरंग : माफी मागण्याची चूक करणे चांगले!

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

अनेकदा स्वतःच्या कृतीचे आणि स्वतःच योग्य असल्याचे समर्थन करताना तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करता. जेव्हा कुणी तुमच्या कृतीमुळे दुःखी होतो, तेव्हा तुमच्या त्या कृतीचे समर्थन त्याच्यासमोर करणे व्यर्थ आहे आणि अयोग्यही आहे. अशावेळी केवळ क्षमा मागितल्याने त्या व्यक्तीच्या भावनांना उभार मिळतो आणि कडवटपणा दूर होण्यास मदत होते. अशा अनेक प्रसंगी स्वतःच्या कृतीचे समर्थन करीत बसण्यापेक्षा केवळ ‘क्षमस्व’ म्हणणे हे कितीतरी चांगले असते. कारण त्याने बरेच वितुष्ट नाहीसे होते.

‘क्षमस्व’ हा तीन अक्षरी शब्द (अथवा त्याचे इंग्रजी रूप, सॉरी) जेव्हा प्रामाणिकपणे बोलला जातो, तेव्हा तो सहज क्रोध, अपराधी भाव, द्वेष आणि अंतर नष्ट करू शकतो. अनेक लोकांना दुसऱ्यांकडून क्षमा मागवून घेण्यात आणि ‘सॉरी’ हा शब्द ऐकण्यात खूप गर्व वाटतो. कारण त्यामुळे त्यांच्या अहंकाराला खतपाणी मिळते. पण जेव्हा तुम्ही एका ज्ञानी माणसाला संबोधून ‘क्षमस्व’ वा ‘सॉरी’ म्हणाल, तेव्हा तुमच्या अडाणीपणाबद्दल त्याला करुणा वाटेल! आणि जेव्हा तुम्ही आपल्या गुरुसमोर ‘क्षमस्व’ म्हणाल, तेव्हा तो तुमच्यावर रागावेल आणि म्हणेल, ‘जा, जाऊन अष्टावक्रगीता ऐक!’ (हशा) कारण तुमच्या क्षमायाचनेत कर्तेपणाचा गंध असतो. जी चूक ‘झाली’, ती ‘तुम्ही केली’ असे तुम्हाला वाटते?

चुकीचे कृत्य हे बेसावध वा बेभान मनाचे कृत्य असते. एक बेभान मन काहीही योग्य करीत नाही आणि एक भानावर असलेले, सावध मन काहीही चुकीचे कृत्य करत नाही. चूक करणारे मन आणि चुकीची जाणीव होऊन क्षमा मागणारे मन ही दोन भिन्न मने आहेत, नाही का? क्षमा मागणारे मन बेभान असू शकत नाही.

म्हणून प्रामाणिकपणे ‘क्षमस्व’ म्हणणे, ही मोठी चूक आहे! तुम्हाला हे समजतंय की तुम्ही गोंधळात पडलात? जर तुम्हाला अर्थबोध झाला नसेल, तर वाईट वाटून घेऊ नका, क्षमा मागू नका ... किंवा, घ्या वाईट वाटून! (हशा) किती अजब प्रकार आहे ना! सत्य नेहमीच विरोधाभासी वाटते!

loading image
go to top