निरोगी आरोग्यासाठी 'योगा विथ डान्स अॅन्ड म्युझिक'

नंदिनी नरेवाडी
Monday, 9 December 2019

नव्या जुन्या गीतांच्या ठेक्‍यावर आसने केली जातात. यातून हात, पाय, कंबर, मानेचा व्यायाम होईल याची दक्षता घेत मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला जातो. 

कोल्हापूर  - शरीराबरोबरच मन तंदुरूस्त ठेवण्यासाठी व्यायामाला महत्व आहे. मात्र तोच तोच व्यायाम सतत करताना कंटाळा येतो. हा कंटाळा घालविण्यासोबतच मनालाही उभारी देणाऱ्या संगीताची जोड या व्यायामाला दिल्यास मनही तंदुरूस्त होते. असा संगीतासोबतचा व्यायाम शहरात रूढ होतो आहे. शहरात जवळपास 600 हून अधिक लोक या व्यायामाचा रोज विविध भागात सराव करत आहेत.

'योगा विथ डान्स ऍन्ड म्युझिक' काय आहे प्रकार ?

सुकृत फांऊडेशन आयोजित या 'हॅपीनेस योगा थेरपी विथ डान्स अँण्ड म्युझिकला' लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंतची पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा सहभाग अधिक आहे. सदृढ आरोग्यासाठी अनेकजण विविध योगासने करतात. प्राणायमासोबत ही योगासने शिकण्यासाठी अनेकजण योगासन वर्गात जातात. परंतू काही दिवसांतच याचा कंटाळा येऊ लागतो. हीच बाब ओळखून येथील सुरेंद्रचंद्र शहा यांनी 'योगा थेरपी' ची ही नवी संकल्पना समोर आणली. यामध्ये सुरवातीला हास्यांचे विविध प्रकार घेतले जातात. त्यानंतर ऍक्‍युप्रेशर होण्यासाठी विशिष्ट प्रकारात टाळ्या वाजवल्या जातात. ओमकार थेरपी, विठ्ठल नामातून पोटाचा व्यायाम केला जातो. यानंतर नव्या जुन्या गीतांच्या ठेक्‍यावर आसने केली जातात. यातून हात, पाय, कंबर, मानेचा व्यायाम होईल याची दक्षता घेत मनसोक्त नृत्याचा आनंद घेतला जातो.

 राजारामपुरी, टाकाळा येथील ऑक्‍सिजन पार्क, हुतात्मा गार्डन, ताराराणी गार्डन, टाऊन हॉल व कणेरकर नगर येथे रोज सकाळी सात ते साडे सात यावेळेत ही योगा थेरपीतून व्यायाम केला जातो. 

जाणुन घ्या - काय आहे हे फ्युजन फुड ? 

या योगा थेरपीमध्ये लहान मुलांसोबत मध्यमवयीन व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्या त्या ठिकाणी प्रशिक्षक या योगा थेरपीचे प्रशिक्षण देतात. रोजच्या सरावामुळे येथे येणाऱ्या अनेकजणांचे संधिवात, पोटाचे विकार, गुडघेदुखी, पाठदुखी कमी झालेली आहेत. तसेच वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 
- सुरेशचंद्र शहा, उल्का शहा 
सुकृत फांऊडेशन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Yoga with Dance and Music' this famous trend in Kolhapur