नांदेडमध्ये चोरी केलेले १२ मोबाईल, एक दुचाकी जप्त 

अभय कुळकजाईकर
Tuesday, 27 October 2020

गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणे, मोबाईल चोरणे, दुचाकी चोरण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे याबाबत शिवाजीनगर ठाण्यातील शोध पथकाने गस्त घालत असताना सनी उर्फ हरप्रितसिंग रविंद्रसिंग लांगरी (वय २५, रा. अबचलनगर, नांदेड) आणि किशोर निवृत्ती वानखेडे (वय २०, रा. लाहोटी कॉम्प्लेक्स, वजिराबाद, नांदेड) या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले.

नांदेड - शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील शोध पथकाने जबरी चोरीतील १२ मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली. त्याचबरोबर या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणे, मोबाईल चोरणे, दुचाकी चोरण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे याबाबत शिवाजीनगर ठाण्यातील शोध पथकाने गस्त घालत असताना सनी उर्फ हरप्रितसिंग रविंद्रसिंग लांगरी (वय २५, रा. अबचलनगर, नांदेड) आणि किशोर निवृत्ती वानखेडे (वय २०, रा. लाहोटी कॉम्प्लेक्स, वजिराबाद, नांदेड) या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. 

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील पंधरा जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श’ -

पाच आरोपी झाले निष्पन्न
त्यानंतर त्यांनी शेख अय्याज शेख इजाज (वय २३, रा. खडकपुरा, नांदेड), निखील दीपक नौबते (वय १९, रा. आंबेडकरनगर, नांदेड) आणि चंद्रकांत सुभाष चौदंते (वय २०, रा. भीमनगर, नांदेड.) यांची नावे सांगितली. त्यानुसार आणखी तीन आरोपी निष्पन्न झाले. त्यांनी बारा मोबाईल चोरले असून त्यापैकी नऊ मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण दोन लाख १७ हजार ९९७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार तर वजिराबाद पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता.

साडेदहा हजारांची देशी दारू जप्त 
नांदेड ः शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्या लोकांची माहिती घेऊन छापे टाकले. त्यात माधव कचरू सावंत (वय ५५, रा. आंबेडकर नगर) आणि साईनाथ दिगंबर गिरी (वय २१, रा. दत्तनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दहा हजार ८६४ रुपयांच्या देशी दारूच्या ११२ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - कलावंतांची उपासमार थांबविण्यासाठी कलाकेंद्रे सुरू करावीत 

भोकरला सलूनमध्ये चोरी 
नांदेड ः भोकर तहसील कार्यालयासमोर ए टू झेड मोबाईल शॉपी समोर सुनील राचुटकर यांचे हेअर कटींग सलून आहे. या दुकानाच्या पाठीमागून सोमवारी (ता. २६) रात्रीच्या वेळी टिनपत्रा वाकवून व प्लायवूड कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातील रोख २५ हजार रुपये आणि पाचशे रुपयांचा स्पीकर चोरून नेला. याबाबत भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार पठाण करत आहेत. 
 
९५ हजारांचे वाहन चोरीला 
नांदेड ः कृष्णूर (ता. नायगाव) येथील व्यापारी सुधाकर विश्वनाथ वट्टमवार (वय ५४) यांनी त्यांची ९५ हजार रुपये किंमतीचे चारचाकी पिकअप वाहन (एमएच २६ - एडी ६२१०) रात्री घरासमोर उभे केले. चोरट्यांनी ते वाहन चोरून नेले. याबाबत कुटुंर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार कुमरे करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 stolen mobiles, one two-wheeler seized in Nanded, Nanded news