२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते, हा हल्ला कुणीही विसरु शकणार नाही- निसार तांबोळी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 28 November 2020

त्यागराज, स्वराली, गितांजली, मास्टर विपूलनी गाजवला सैनिक हो तुमच्यासाठी

नांदेड : मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत केली, असे प्रतिपादन पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले. संवादच्या वतीने आयोजित सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमात त्यागराज खाडीलकर, गितांजली जेधे, स्वराली जाधव, मास्टर विपूल, श्रीरंग चिंतेवार, पौर्णिमा कांबळे यांच्या संचाने देशभक्तीपर गिते गावून उपस्थित निमंत्रितांणा मंत्रमुग्ध केले.

संवाद संस्था आणि नांदेड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी तांबोळी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकरी वर्षा ठाकूर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, संपादक शंतनू डोईफोडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा नांदेड : आमदार सतीश चव्हाण यांच्या विजयात शिवसैनिकांनी सिंहाचा वाटा उचलावा- मंत्री उदय सामंत -

यावेळी बोलताना निसार तांबोळी म्हणाले की, त्यावेळी मी मुंबईतच होतो, या हल्ल्याने देशातीलच नव्हे तर जगभरातील सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबई पोलिसांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतूक केले. अनेक देशांची सुरक्षा पथके या हल्ल्यानंतर मुंबईमध्ये आली होती. त्यांनी त्यांचा अभ्यास केला व आपली सुरक्षा मजबूत केली. यावेळी वर्षा ठाकूर, अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे, विजय जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर सुरु झाला सैनिक हो तुमच्यासाठीचा ५३ वा प्रयोग. सुरुवातीलाच मास्टर विपूल जोशी यांनी हिच अमुची प्रार्थना हे गीत अत्यंत गंभीर वातावरणात सादर केले. त्यानंतर गितांजली जेधे यांनी सैनिक हो तुमच्यासाठी, हे वतब, हर करम अपना करेंगे ही गाणी सादर केली. मास्टर विपूल जोशी यांनी जय जय महाराष्ट्र हे गीत मोठ्या जल्लोषात सादर केले. महाराष्ट्राचा प्रख्यात गायक त्यागराज खाडीलकर यांनी है प्रित जहाँ की रित सदा, सुनो गौर से दुनियावालो ही गिते गावून रसिक, प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सुनो गौरच्या मेलडी साँगने त्यागराज यांनी आपल्या गाण्याचे कसब दाखवून रसिकांचा वन्समोअर मिळविला. पौर्णिमा कांबळे हिने म्यानातून उसळे आणि देश मेरा रंगीला ही दोन गिते सादर करुन दाद मिळविली. सुर नवा ध्यास नवाची महागायिका मुळची माहूरची. हिने सादर केलेल्या मेरा मुलक मेरा देश आणि मेरा रंग दे बसंती चोला या देशभक्तीने गिताला रसिकांनी दाद दिली. श्रीरंग चिंतेवार यांनी तेरी मिट्टी मे मिल जावा हे अत्यंत अवघड गीत उत्कृष्टपणे सादर करुन रसिकांच्या टाळ्या मिळविल्या.  चिंतेवार यांच्या ए देश है वीर जवानों का या गाण्यावर रसिकांनी ठेका धरला.  

येथे क्लिक करा - नांदेड : दुग्ध व्यवसायातून अल्पभुधारक शेतकऱ्याची भरारी, गुलाब पुष्पानेही दिला आधार

यावेळी नांदेडच्या नृत्यालय स्कुल ऑफ परफॉर्मिग आर्टसच्या दमदार कलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनालेख आणि उरीच्या घटनेवर आधारीत दोन नृत्याविष्कार सादर केले. रसिकांनी या दोन्ही नृत्यांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
दिग्दर्शक विजय जोशी यांच्या मराठी पाऊल पडते पुढे या गाण्याला चांगलीच दाद मिळाली. महाराष्ट्राचा प्रख्यात निवेदक सद्दाम शेख तसेच कार्यक्रमाचे निर्माते गझलकार बापू दासरी यांनी उत्कृष्ट संचलन सादर करुन २६/११ च्या आठवणी जागवल्या. सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर, तापमान मोजणे आणि ऑक्सीमीटरचा वापर करुन प्रेक्षकांची चाचणी करुनच शंकरराव चव्हाण सभागृहात चारशे प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला होता. उत्कृष्ट नियोजन आणि संगीत कार्यक्रमाची स्थानिक कलावंतांनी केलेली मांडणी सोबतच मुंबई, ठाणे, पुणे येथील कलावंतांनी केलेल्या सादरीकरणाने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26/11 attack was a challenge for the whole world, no one can forget this attack Nisar Tamboli nanded news