Nanded : तीन लाखांच्यावर शेतकऱ्यांकडे एक हजार १०६ कोटींची थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : तीन लाखांच्यावर शेतकऱ्यांकडे एक हजार १०६ कोटींची थकबाकी

नांदेड : महावितरण रब्बी हंगामातील वीज पुरवठ्यासाठी तत्पर आहे. मात्र, नांदेड परिमंडळातील तब्बल तीन लाख सहा हजार १०२ शेतकऱ्यांकडे आज रोजी एक हजार १०६ कोटी ३१ लाख रूपयांची थकबाकी आहे. रब्बी हंगामातील अखंडीत वीज पुरवठयासाठी कृषीपंपाच्या वीजबिलांची थकबाकी वसूल होणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी महावितरणला सहकार्य करत थकबाकी भरावी अन्यथा नाईलाजास्तव कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत करण्याशिवाय पर्याय नाही, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणची आर्थिक स्थिती अद्यापही चिंताजनक असून वीज खरेदी व देखभाल दुरुस्तीसाठी घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वीज ग्राहकांसोबतच कृषी पंपाची करोडो रुपयांची थकबाकी वसूल होणे अत्यावश्यक झाली आहे. महावितरणने राबविलेल्या महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी पंप वीज जोडणी धोरण राबवून शेतकऱ्यांना विलंबाकार आणि व्याजातील सूट दिल्यानंतर सुधारित थकबाकी नुसार ५० टक्के वीज बिल माफीची संधी दिली होती. मात्र, या धोरणाचा फायदा काही मोजक्याच शेतकऱ्यांनी घेतला. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या धोरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

नांदेड परिमंडळात यंदा पाणी भरपूर उपलब्ध असून रब्बी हंगामात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली वीज खरेदी, कृषी पंपाच्या रोहित्र दुरुस्तीसाठी लागणारे ऑईल खरेदी तसेच इतर आवश्यक दुरुस्तीसाठी कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाची वसुली होणे, गरजेचे झाले आहे.

कृषीपंप वीज जोडणी धोरणाच्या माध्यमातून वीजबिलांच्या वसुलीतून प्राप्त झालेला ६६ टक्के आकस्मिक निधी हा प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जमा झालेला निधी ग्रामपंचायत व स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे कृषीपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :NandedFarmeragriculture