esakal | नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांत ६२ टक्के पाणीसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांत ६२ टक्के पाणीसाठा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: गेल्या चार पाच दिवसापासून दमदार तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत असून जिल्ह्यातील प्रकल्पातही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात पाणीसाठा वाढत असून गुरूवारपर्यंत (ता. २२ जुलै) ४५६.८६ दशलक्षघनमीटर म्हणजेच ६१.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. विष्णुपुरी प्रकल्प देखील पुन्हा भरल्यामुळे शुक्रवारी (ता. २३) तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेड पाटबंधारे मंडळाने साप्ताहिक पाणी पातळी अहवाल दिला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी आणि मानार हे दोन मोठे प्रकल्प, नऊ मध्यम, नऊ उच्च पातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प आणि चार कोल्हापुरी बंधारे असे एकूण ११२ प्रकल्प आहेत.

या प्रकल्पात सध्या एकूण पाणीसाठा ४५६.८६ दशलक्षघनमीटर म्हणजेच ६२.२३ टक्के झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जास्त असून गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ३३७.४७ दलघमी म्हणजेच ४५.२३ टक्के पाणीसाठा झाला होता. गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ७९.२४ दलघमी म्हणजेच ९८.०८ टक्के पाणीसाठा असून तीन दरवाजे उघडून त्यातून एक हजार ६५ क्युमेक्स विसर्ग करण्यात आहे. प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्यानंतर पुन्हा दरवाजे उघडावे लागणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे पूर नियंत्रण अधिकारी शाखा अभियंता अर्जुन सिंगनवाड यांनी दिली. मानार प्रकल्पात १०५.९५ दलघमी (७६.६६ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यात आणखी वाढ होत आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत एक लाखाची वेटींग अन् डोस मिळणार सात हजार

जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात ८४.२६ दलघमी (६०.५९ टक्के) पाणीसाठा तर नऊ उच्च पातळी प्रकल्पात ७७.५३ दलघमी (४०.८५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ८८ लघु प्रकल्पात १०९.८८ दलघमी (५७.५९ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दमदार पावसामुळे सर्व प्रकल्पात जास्तीचा पाणीसाठा झाला आहे. चार कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे सध्या उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यात पाणीसाठा झाला नाही.
नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ५२७.२९ दलघमी (६५.१२ टक्के) तर सिद्धेश्वर प्रकल्पात ५०.२६ दलघमी (६२.०८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ५८१.१६ दलघमी (६०.२८ टक्के) पाणीसाठा झाला असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाने दिली आहे.

loading image
go to top