परभणी : गुरुजींवर वजन काटा हाती घेण्याची वेळ

शालेय पोषण आहारात मीठ-जिरे-मोहरी व हळद-लसूण मसाल्याची भर
Allocation of school nutrition under Pradhan Mantri Poshan Shakti Yojana food
Allocation of school nutrition under Pradhan Mantri Poshan Shakti Yojana foodsakal

परभणी : शालेय पोषण आहार वाटपात आता प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत मार्च व एप्रिल महिन्याच्या ४३ दिवसांचे धान्य वाटप करण्याचे आदेश शिक्षण विभागाने बजावले आहेत. आता तांदूळ, मूगदाळ, चना, वटाण्याबरोबच मीठ-मसाला, लसूण, जिरे-मोहरी वाटप केले जाणार आहे. वाटपाचे पुन्हा एकदा नियोजन गुरुजींवर सोपविण्यात आले असून, गुरुजींना पाच-दहा ग्रॅम वाटपासाठी सूक्ष्म काटा घेऊनच बसावे लागणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार योजनेचे लेखाधिकारी यांनी ता. नऊ मे रोजी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. तर, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने तालुक्यातील शासकीय, शालेय पोषण आहार योजनेत पात्र खासगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना आदेश पाठवून तत्काळ तांदूळ, धान्य अन्नपदार्थ वाटपाचे आदेश बजावले आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना ता. १५ मार्च ते एप्रिल या ४३ दिवसांचे तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात आला असून, तो मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीने कोरोना नियमांचे पालन करुन विद्यार्थ्यांना वाटप करावा. धान्यादी वस्तु व तांदूळ सुट्या स्वरूपात वाटप करण्यात येणार असल्याने तांदूळ घेण्यासाठी कापडी पिशवी, गोणी सोबत आणण्याबाबत विद्यार्थी, पालकांना सूचना द्याव्यात व त्याच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवण्यात याव्यात, पालकांची पोहोच घ्यावी, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचा बोजा

शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. याचा अध्यापनावर देखील परिणाम होऊ लागला आहे. या कामांच्या निमित्ताने शिक्षक शाळेपासून दुरावत चालले आहेत. अनेक वेळा शिक्षक संघटनांनी न्यायालयीन आदेशाचा दाखला देऊन अशी शाळाबाह्य कामे करण्यास विरोध दर्शविला आहे. परंतु, दिवसेंदिवस कामांची संख्या वाढू लागली आहे. जनगणना, पंचायत समिती, नगरपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणूका, विविध प्रकारची सर्वेक्षण, बांधकाम आदी कामाचा बोजा अगोदरच असताना कोरोना काळात तर कोविड सेंटर्सपासून लसीकरण, चेकपोस्ट, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरीकांना मदत म्हणून देखील त्यांना सेवा द्यावी लागली आहे. अगोदर तांदूळ, दाळींचे वाटप होतेच. परंतु आता पाच-दहा ग्रॅम जिरे मोजून देण्यासाठी शिक्षकांना वजन काटा हाती घ्यावयाची वेळ आली आहे.

असे होणार मसाल्यांचे वाटप

शालेय पोषण आहार योजनेत तांदूळ, डाळी बरोबरच मसाल्यांची देखील भर पडली आहे. हे सर्व मसाले सुट्या स्वरूपात आले तर निश्चितच गुरुजींना सुक्ष्म वजन काटा घेऊन बसावे लागणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ ४,३०० ग्रॅम, मूगदाळ २८० ग्रॅम, वटाणा २८० ग्रॅम, चणा ३०० ग्रॅम, मीठ ८६ ग्रॅम, हळद १४.४५ ग्रॅम, कांदा- लसूण मसाला ५९.२० ग्रॅम, मोहरी १० ग्रॅम, तर जिरे ७.१० ग्रॅम वाटप केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com