कोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच नांदेडला अशोक चव्हाण यांचे आगमन
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे दुपारी एक वाजता नांदेडच्या श्रीगुरुगोविंदसिंगजी विमानतळावर सहकुटुंब आगमन झाले. कोरोना बाधित झाल्यानंतर ता. २२ मे रोजी श्री. चव्हाण नांदेडहून मुंबईला गेले होते. त्यानंतर कोरोनामुक्त होऊन तब्बल ३५ दिवसांनी त्यांचे शुक्रवारी दुपारी नांदेडला आगमन झाले.
नांदेड - माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर तब्बल ३५ दिवसांनी त्यांचे शुक्रवारी (ता. २६) दुपारी एक वाजता मुंबईहून नांदेडच्या विमानतळावर श्री. चव्हाण यांचे सहकुटुंब आगमन झाले. यावेळी प्रशासनासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
मुंबईहून नांदेडला गेल्या महिन्यात आल्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते ता. २२ मे रोजी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईला उपचारासाठी रवाना झाला. त्यानंतर त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली.
हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला कोरोनाचा पंधरावा बळी
मुंबईतील निवासस्थानी होम क्वारंटाइन
कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर ते मुंबईतील निवासस्थानी होम क्वारंटाइन झाले. त्यानंतर मुंबईत त्यांनी काम सुरु केले. मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नांदेडच्या अधिकारी, विभागप्रमुखांच्या बैठकाही घेतल्या. शुक्रवारी (ता. २६) त्यांनी नांदेडला येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते मुंबईहून नांदेडला सहकुटुंब शुक्रवारी दुपारी एक वाजता आले.
स्वागतासाठी गर्दी करु नका...
दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेडला शुक्रवारी दुपारी विमानाने आगमन होत असले तरी जागतिक स्तरावरील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीमुळे कॉँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी करु नये, असे आवाहन विधानपरिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद तथा नांदेडचे कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर आणि जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी केले होते. तरी देखील विमानतळावर श्री. चव्हाण यांच्या चाहत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
हेही वाचलेच पाहिजे - जयंती विशेष : बहुजनांचे कैवारी : राजर्षी शाहू महाराज
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले स्वागत
नांदेडच्या विमानतळावर श्री. चव्हाण यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम स्वतःची आरोग्याची तपासणी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी स्वागतासाठी महापौर दीक्षा धबाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, विधानपरिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद व कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेचे सभापती संजय बेळगे, माजी सभापती किशोर स्वामी, माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, सभापती बाळासाहेब रावणगावकर, ॲड. रामराव नाईक, सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.