औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक : नांदेड जिल्ह्यात 64.07 टक्के मतदान

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 2 December 2020

जिल्ह्यातील मतदार यादीनुसार एकूण 49 हजार 285 एवढे मतदार असून यात 10 हजार 853 स्त्री, 38 हजार 432 पुरुष मतदार आहेत. जिल्हाभर विखुरलेल्या मतदारांना मतदान करणे सोयीचे ठरावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने 123 मतदान केंद्र उभारली होती.

नांदेड :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 साठी नांदेड जिल्ह्यातील वृध्दांसह नवीन पदवीधर मतदारांनी उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने कुठेही अनुचित प्रकार न होता मतदान 64.07 टक्के झाले.

जिल्ह्यातील मतदार यादीनुसार एकूण 49 हजार 285 एवढे मतदार असून यात 10 हजार 853 स्त्री, 38 हजार 432 पुरुष मतदार आहेत. जिल्हाभर विखुरलेल्या मतदारांना मतदान करणे सोयीचे ठरावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने 123 मतदान केंद्र उभारली होती. सकाळी 8 ते सांयकाळी 5 पर्यंत हे मतदान कोविडअतंर्गत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करुन घेण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर व प्रत्येकाचे तापमानही तपासण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील एकूण 123 मतदान केंद्रावर सांयकाळी 5-00 वाजेपर्यंत 64.07 टक्के मतदान झाले. यात नांदेड तालुक्यातील 30 मतदान केंद्रावर 56.72 , मुखेड तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 66.78 टक्के , अर्धापूर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 69.58 टक्के , भोकर तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 67.70 टक्के, उमरी तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 76.90 टक्के, कंधार तालुक्यातील नऊ मतदान केंद्रावर 62.71 टक्के, लोहा तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 63.48 टक्के, किनवट तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के, माहूर तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 74.92 टक्के,

हदगाव तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 70.87 टक्के , हिमायतनगर तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर 70.76 टक्के, देगलूर तालुक्यातील आठ मतदान केंद्रावर 67.55 टक्के, बिलोली तालुक्यातील सहा मतदान केंद्रावर 70.92 टक्के, धर्माबाद तालुक्यातील चार मतदान केंद्रावर 69.64 टक्के, नायगाव तालुक्यातील सात मतदान केंद्रावर 69.16 टक्के, मुखेड तालुक्यातील दहा मतदान केंद्रावर 67.28 टक्के एवढे मतदान झाले . यात संपूर्ण जिल्हाभर 26 हजार 331 पुरुषांनी तर 5 हजार 247 स्त्री मतदारांनी मतदान केले. एकूण 49 हजार 285  मतदारांपैकी 31 हजार 578 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदाराच्या टक्केवारीत हे प्रमाण 64.07 टक्के ऐवढे होते.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Division Graduate Election: 64.07 per cent polling in Nanded district