esakal | बाळा आता थोडा वेळ तरी पुस्तक घे...! पालकांची बालकांना विनवणी; शाळा बंद, पण तळमळ चालू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बाळा आता थोडा वेळ तरी पुस्तक घे अशी पालकांकडून बालकांना विनवणी होत असल्याचे चित्र आहे.

बाळा आता थोडा वेळ तरी पुस्तक घे...! पालकांची बालकांना विनवणी; शाळा बंद, पण तळमळ चालू

sakal_logo
By
विठ्ठल चिवडे

कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाने जग हदरवलं, निर्माण झालेल्या अभुतपुर्व परिस्थितीमुळे सर्व काही स्तब्ध झालं. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील शिक्षणावरही झाला. प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शाळाव्यासंगी चिमुकल्यांचा शाळेतील आनंद हिरावला गेला. बालवयातील शिक्षणावाचून होणारी परवड ही पालकांची चिंता वाढवणारी बाब ठरत असून बाळा आता थोडा वेळ तरी पुस्तक घे अशी पालकांकडून बालकांना विनवणी होत असल्याचे चित्र आहे. शाळा बंद पण शिक्षण चालू या ऐवजी "शाळा बंद आणि तळमळ चालू" अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुरुळा बिट अंतर्गत बोळका आणि दिग्रस केंद्रात जवळपास अडीच हजाराच्या आसपास विद्यार्थी पटसंख्या आहे. टाळेबंदीमुळे बालकांच्या भावविश्वात सदैव किलबिलाट करणाऱ्या शाळा अचानक निरव शांततेत रुपांतरित झाल्या आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून "शाळा बंद पण शिक्षण चालू" हा पर्याय नव्याने समोर आला. कंधार तालुका दुर्गम आणि डोंगराळ असल्याने अनेक वाडी- तांड्यांची संख्या जास्त आहे. मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती आणि मिळेल ती मजुरी यावरच केवळ संसार प्रपंच असल्याने नेहमीच आर्थिक चणचण. त्यात कोरोनाची टाळेबंदी आणि मुलांची शिक्षणावाचून होणारी परवड आता पालकांसाठी वेदनादायी होताना दिसत आहे.

आमूलाग्र बदल पालक आणि विद्यार्थ्यांसाठी चिंतेचे बनले आहे

मानवी जीवप्रक्रियेत शिक्षण मानवाच्या उन्नतीचे मूलाधार असून त्यामुळे भविष्याच्या पिढीची होणारी फरफट पालकांना न पाहवणारी आहे. काहींना ऑनलाईन शिक्षणाचा काही प्रमाणात आधार मिळाला खरा परंतु शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट यातून साध्य होत आहे का? तळागाळातील मुलांकडे पालकांची इच्छा असूनसुद्धा परिस्थितीचे ओझे आणि डिजिटल साधने, स्मार्टफोनच्या अभावी शिक्षणावाचून उपेक्षा होत असल्याचे चित्र आहे. कधी नव्हे ते कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत झालेले अभूतपूर्व आणि आमूलाग्र बदल पालक आणि विद्यार्थ्यांसाठी चिंतेचे बनले आहेत.

आमची शाळा कधी सुरु होईल असा या चिमुकल्यांचा भाबडा प्रश्न डोळसनांही अंतर्मुख करेल अशीच परिस्थिती

रेखा तांडा येथील चौथी इयत्तेत शिकणाऱ्या दिव्या राठोड, पूजा पवार, काजल राठोड तर तीसरीतील कृष्णा राठोड, शिवकांता राठोड यासह कोमल राठोड आणि रोहिणी राठोड यांना पाहताक्षणी शाळेसाठी आसुसलेल्या चेहऱ्याचे दर्शन होते. घरची जेमतेम परिस्थिती असल्याने पालक उसतोडीसाठी आणि इतर कामासाठी इतरत्र गेले आहेत. खाण्याची भ्रांत आहे. असे यमुनाबाई गोविंद राठोड सांगत होत्या. स्मार्टफोन नाही की ऑनलाइनचा मागमूस नाही त्यामुळे भविष्यातील अंधार अधिकच गडद असेच काहीसे चित्र आहे. आमची शाळा कधी सुरु होईल असा या चिमुकल्यांचा भाबडा प्रश्न डोळसनांही अंतर्मुख करेल अशीच परिस्थिती. त्यामुळे केवळ" बाळा आता तरी थोडा वेळ पुस्तक घे "असे म्हणण्यापलीकडे पालकांकडे काहीच उरले नाही हे मात्र नक्की.

भाकरीची भ्रांत असणाऱ्यांना स्मार्टफोन भेटणे शक्य नाही

कोरोनामुळे कुरुळा भागातील वाडी- तांड्यावरील प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची अवस्था दयनिय आहे. भाकरीची भ्रांत असणाऱ्यांना स्मार्टफोन भेटणे शक्य नाही. समाजातील इतर सुशिक्षित असलेल्या तरुणांनी पुढे येऊन आपापल्या गल्लीतील मिळेल त्या वेळेत वंचित मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिल्यास नक्कीच फायदा होईल.
- बाळासाहेब गोमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी, नांदेड.

संपादन - प्रल्हाद कांबळे