
माता रमाईच्या त्यागाची सामाजिक क्रांती आहे. यासाठी आपण सर्वांनी रमाईच्या विचारांचे वारसदार व्हावेत
नांदेड : माता रमाईच्या भक्कम साथीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशपातळीवर दीन, दलित, कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाला, विशेषत: स्त्रियांना मानसिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन माणुसकीचे हक्क प्राप्त करुन देण्यासाठी अधिक वेळ मिळाला. आज देशातील बहुजनांचे जे ऐश्वर्य आहे हे केवळ बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानामुळे आहे. ही माता रमाईच्या त्यागाची सामाजिक क्रांती आहे. यासाठी आपण सर्वांनी रमाईच्या विचारांचे वारसदार व्हावेत, असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ राम जोगदंड यांनी कांशी- माया प्रबोधन मंच आयोजित त्यागमूर्ती माता रमाई जयंती प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त कोषागार अधिकारी शंकरराव शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून एम. एम. ढवळे, निवृत्त गटविकास अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते बी. एल. बोईनवाड हे होते.
पुढे बोलताना अॅड. जोगदंड म्हणाले की, आज प्रत्येक कुटुंब प्रमुखाने बहुजन समाजातील संत, गुरु, महापुरुष यांची परिवर्तनवादी विचारधारा व भारतीय संविधानातील मूल्ये आपल्या कुटुंबात समजावून सांगावेत व संविधान कसे अबाधीत राहील, त्याच्या मूल्याची जपवणूक कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना शिंदे यांनी माता रमाईच्या जीवनातील प्रेरणादायी, परिवर्तनवादी विचार महिलांनी अंगिकारुन समाजात संघटीतरित्या सामाजिक क्रांती घडवून आणावी. माता रमाईने स्वत: ची काळजी न करता समाजाची काळजी घेतली. स्वत: चे दागीने विकून समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी तुकाराम टोम्पे, दिगंबर वाघमारे व प्रभाकर वाघमारे यांनीही विचार मांडले. बळवंत घोरपडे, गणेशराव वाघमारे, गंगाधर सर्जे, शंकरराव कोकरे, ए. वाय. वाकळे, उत्तम टोम्पे, पी. व्ही. कांबळे, जी. एल. वाघमारे, संदीप कांबळे आदींनी परिश्रम घेतले.