दिलासादायक ः बाधित पिकांच्या पंचनाम्यास सुरवात

20201001_102951.jpg
20201001_102951.jpg

कुरुळा, (ता. कंधार, जि. नांदेड) ः यंदाच्या हंगामात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गत हंगामाची पुनरावृत्ती होऊन सोयाबीन ज्वारीसह कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या पिकांची नासाडी झाली त्यासंदर्भात तहसीलदार कंधार यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुळा व दिग्रस मंडळातील बाधित पिकांच्या पंचनाम्यास सुरवात झाली असून दिलासादायक आर्थिक मदत व्हावी अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. 

करपा रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापसाचेही नुकसान 
मागील पाच ते सहा वर्षांपासून कुरुळा व दिग्रस मंडळात कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा तडाखा आणि दिमतीला रोग व किडींचा प्रादुर्भाव अशा नैसर्गिक संकटमालिकेत शेतकरी भरडला जातोय. पिकांचा व उत्पन्नाचा दर्जा घसरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील दशकाच्या तुलनेत यंदा सप्टेंबर अखेर पावसाने सरासरी ओलांडली असून आत्तापर्यंत ७४५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. मंडळात प्रामुख्याने सोयाबीन ज्वारीसह कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या सोयाबीन व ज्वारी पिकासह लाल्या करपा रोगांच्या प्रादुर्भावामुळे कापसाचेही नुकसान होत आहे. 


पिकांच्या पंचनाम्याला सुरवात 
कुरुळा, बोळका, मरशिवणी, वाहाद, महालिंगी, कारतळा, नंदनशिवणी, नागलगाव, दैठणा, सोमठाणा, हनमंतवाडी सोयाबीन ज्वारी आणि कापसाचे मोठे क्षेत्र असून लागवड खर्च निघेल की नाही अशी भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने थेट बांधावर जाऊन तहसीलदार सखाराम मांडवगडे व कृषी अधीकारी रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुळा मंडळ अधिकारी गजलवार व दिग्रस मंडळ अधिकारी शेख यांच्या नेतृत्वाखाली कुरुळा सज्जा तलाठी अन्सारी, कृषी सहायक विजय चामले यासह इतर सज्जानुरूप उपस्थित कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष बाधित पिकांच्या पंचनाम्याला सुरवात झाली आहे. 

‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश
अतिवृष्टीमुळे हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याची बातमी ‘सकाळ’मधून छायाचित्रासह नुकतीच प्रकाशित करण्यात आली होती. बाधित पिकांचे पंचनामे व्हावेत अशी शेतकऱ्यांतुन मागणी जोर धरत होती. ‘सकाळ’ने त्यास प्रतिसाद देत बातमीतून दुजोरा दिला होता. यासंदर्भात तहसीलदार कंधार यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश काढले होते. या मुळे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com