esakal | लॉकडाउनमध्ये लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित; ‘ई-पॉस’मध्ये डाटा अपलोड न झाल्याचा परिणाम

बोलून बातमी शोधा

e poss machine
लॉकडाउनमध्ये लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित; ‘ई-पॉस’मध्ये डाटा अपलोड न झाल्याचा परिणाम
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः ऐन लॉकडाउनमध्ये लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. ‘ई-पॉस’मध्ये डाटा अपलोडच झालेला नसल्याने, अन्नधान्याचे वाटप रखडले असून, स्वस्त धान्य दुकानदारांचीही डोकेदुखी वाढली आहे.

कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी असून, सर्व व्यवसाय ठप्प झालेले आहेत. या बिकट परिस्थितीत गोरगरिबांचे हाल होत आहेत. त्यातच गोरगरिबांना स्वस्त धान्य मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ई- पॉस मशीनमध्ये डाटा अपलोडच झाला नसल्याने अन्नधान्याची प्रक्रिया रखडल्याचे बोलले जात आहे. परिणामी हे धान्य कित्येक दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमध्येच पडून असून, दुकानदारांना अन्नधान्य वटप करण्यास अडचणी येत आहेत.

हेही वाचा - वसमतमध्ये बंदचे आदेश डावलणाऱ्या आडत व्यापाऱ्यांना ४३ हजारांचा दंड

स्वस्त धान्यदुकानदारांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. सध्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झालेले आहेत. लहान, मोठी दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान सुरु नाही. गोरगरीब मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उमासमारीची वेळ आली आहे. शासनाने गरीब कुटुंबियांना स्वस्त धान्याची व्यवस्था केली आहे. परंतु, सदोष यंत्रणेमुळे त्या धान्यापासूनही जनतेला मुकावे लागत आहे. लॉकडाउनच्या काळात रेशनच्या मालाचा मोठा आधार असतो. पण, तेदेखील मिळत नसल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यात एकूण पाच लाख ९२ हजार ११७ शिधापत्रिका धारक आहेत. त्यामध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक ७९ हजार १३ तर एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारक ९१ हजार ६२८ आहेत.

मकाही निकृष्ट दर्जाची

गतवर्षीपासून स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना धान्यासोबतच मका द्यायला सुरुवात केली आहे. परंतु, हा मका निकृष्ट दर्जाचा येत आहे. विशेष म्हणजा हा मका जनावरांना खायला दिला तर तेदेखील खाणार नाहीत. यावरूनच या मक्याचा दर्जा लक्षात येईल. ही बाब पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून दिलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे काही लाभार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. एकंदरीतच नांदेड शहरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानामध्ये निकृष्ट दर्जाचा मका दिला जात असल्याने, लाभार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर येत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे