जागतिक पॅरा अ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत भाग्यश्री जाधवने मारली बाजी; रौप्य, कांस्यपदक पटकावले 

अभय कुळकजाईकर
Wednesday, 17 February 2021

नांदेड जिल्ह्यातील होनवडज (ता. मुखेड) येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव या दिव्यांग खेळाडूने अल्पावधीतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पॅरा अ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन महाराष्ट्रासह भारताची मान उंचावली आहे. २०१९ मध्ये चीन येथे झालेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात तिने कांस्यपदक पटकावले होते.

नांदेड - दुबई येथे नुकत्याच झालेल्या फाजा जागतिक पॅरा अ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत नांदेडची अष्टपैलू आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिने रौप्य व कांस्यपदक पटकावून भारताचा नावलौकिक वाढवला आहे.

नांदेड जिल्ह्यातील होनवडज (ता. मुखेड) येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव या दिव्यांग खेळाडूने अल्पावधीतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पॅरा अ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन महाराष्ट्रासह भारताची मान उंचावली आहे. २०१९ मध्ये चीन येथे झालेल्या जागतिक पॅरा अ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात तिने कांस्यपदक पटकावले होते. या स्पर्धेत सहभागी झालेली महाराष्ट्रातील ती एकमेव खेळाडू होती. 

हेही वाचा - नांदेड : सरपंच दत्ता पाटील पांगरीकर हे धावले महावितरणच्या मदतीला; एक लाख रुपये भरत वीज बिल केले कोरे

जिद्द न सोडता सराव सुरुच ठेवला
दरम्यान, सराव करताना तिच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे नांदेड येथील अस्थीव्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ. राजेश अंबुलगेकर व पुणे येथील ऑर्थो सर्जन डॉ. आशिष बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी काही काळ विश्रांतीचा सल्ला देखील तिला दिला होता. मात्र, स्पर्धेची जिद्द तिने न सोडता सराव सुरुच ठेवला. 

रौप्य, कांस्यपदक पटकावले
ता. सहा ते ता. १४ फेब्रुवारी दरम्यान दुबई येथे झालेल्या फाजा वल्ड अ‍ॅथेलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०१९ या स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. दुबईमध्ये देखील तिने एफ - ३७ या वर्गवारीत गोळाफेक व भालाफेक या क्रीडा प्रकारात रौप्य व कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या जागतिक स्तरावरील विक्रमी वाटचालीची नोंद भारताच्या पॅरा अ‍ॅथेलेटिक्स कमिटीने घेतली आहे.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली जिल्ह्यात कोरोना लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ
 

शारिरिक व्याधीवर मात करत वाटचाल सुरु 
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री जाधवचा क्रीडा प्रवास अत्यंत खडतर असून नांदेड शहरातच सराव व प्रशिक्षण घेवून तिने हे यशोशिखर गाठले आहे. ऑलंपिक व एशियन स्पर्धेत सहभागी होण्याचे तिचे स्वप्न असून शारीरिक व्याधीवर मात करत तिची वाटचाल सुरु आहे. आर्थिक अडचणीमुळे तिला या स्पर्धेत सहभागी होणे दुसर झाले होते. मात्र ‘साईप्रसाद’ परिवारातील दानशूर सदस्यांच्या आर्थिक पाठबळामुळे तिला स्पर्धेत सहभागी होता आले. 

नांदेडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

अनेकांचे मानले भाग्यश्रीने आभार
भाग्यश्री जाधव हिने साईप्रसादचे सर्व सदस्य, वेळोवेळी मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक व सेवाभावी संस्था यांचे आभार मानले आहेत. पीसीआयचे मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण, सरावासाठी पोलीस मुख्यालयाचे मैदान उपलब्ध करुन दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, क्रीडा प्रशिक्षक निलेश खराटे यांचे देखील भाग्यश्री जाधव यांनी आभार मानले आहेत. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhagyashree Jadhav wins World Para Athletics Games; Won silver, bronze nanded sports news