भोकर : कांदा न भाकर खाऊद्या की रं, मला बी शेतावर येऊद्या की रं... 

file photo
file photo

भोकर (जिल्हा नांदेड) : मानवी जीवनात उन्मेष आणि संवेदनांना रिझविणारा वैभवशाली निसर्ग... जगाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाचा सखा-सोबती आहे... काळी माती ही त्यांची खरी धनलक्ष्मी होय... राब- राब राबून हाडाची काडे करून शेतकरी घामातून मोती पिकवतो... तेव्हा कुठं टीचभर पोटाची खळगी भराया लागते... सध्या खरीप पिके वाऱ्यासोबत दंगामस्ती करीत आहेत... काळ्या आईची सेवा हीच जन्मोजन्मीची शिदोरी... आम्ही चाकर तिचे, तिची चाखतो भाकरी... सुखावलेला शेतकरी बांधावर निवांत बसून चार घास सुखाचे खातो आहे. 

मागील तीन- चार वर्षांपासून निसर्गाचा समतोल दोलायमान झाल्याने त्याचा अनिष्ट परिणाम खरीप व रब्बी हंगामावर झाला आहे. याशिवाय मध्येच महागाई आणि कोरोनाने होरपळून काढल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजारपेठेत शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात भरडला गेला. व्यापारी मात्र गब्बर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शासनाने अशा संकटसमयी आधार देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला पण तो हात आखडता घेतल्याने ती मदत पासंगालाही पुरली नाही. एकेकाळी धनधान्याच्या राशी घरात लादणीत पडून असायच्या. आता मात्र लादणी व उतरंडी रिकाम्या आहेत. शेतकऱ्याच्याच नशिबी हे जिणं का बरं यावं असा प्रश्र्न भेडसावतो आहे. अशा भयानक परिस्थितीचा सामना करीत बळिराजा आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकतो आहे. 

पिकांची वाऱ्यासोबत दंगामस्ती 

तालुक्यातील कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद ही पिके वाऱ्यासोबत दंगामस्ती करीत आहेत. सध्या तरी शेतकरी बांधव समाधानी असल्याचे दिसून येत आहे. शेतात निंदणी, खुरपणी, कोळपणी, औषध फवारणीसह खतांची मात्रा देण्यात शेतकरी मश्‍गुल झाला आहे. दुपारच्या वेळी रानात बांधावर बसून शेतकरी व मजूर कांदा, चटणी व भाकरीचा मनसोक्त आनंद घेत आहेत. काळ्या आईची चाकरी केल्याने दोन घास सुखाने भाकरी मिळत आहे, यातच खरे समाधान मिळत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. 
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com