esakal | भोकरचे नागनाथ घिसेवाड यांचा भाजपला जय श्रीराम, काॅंग्रेस पक्षात प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नागनाथ घिसेवाड हे आदिवासी व बहुजन नेते म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा केवळ 500 मतांनी पराभव झाला होता तर भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यासोबतच भोकरचे उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आदी पदांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

भोकरचे नागनाथ घिसेवाड यांचा भाजपला जय श्रीराम, काॅंग्रेस पक्षात प्रवेश

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - भारतीय जनता पक्षाला चिखलीकर मित्रमंडळ प्रायव्हेट लिमीटेड केल्याचे परिणाम आता भाजपामध्ये दिसत असून याचा पहिला झटका बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांनी दिला आहे. चिखलीकरांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी मुंबई येथे काँग्रेस पक्षात गुरुवारी (ता. तीन) रोजी प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे.


नागनाथ घिसेवाड हे आदिवासी व बहुजन नेते म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा केवळ 500 मतांनी पराभव झाला होता तर भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यासोबतच भोकरचे उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आदी पदांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

चिखलीकर मित्रमंडळ प्रायव्हेट लिमीटेड

2013 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वावर प्रभावीत होऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु सर्वपक्षीय भ्रमंती करणारे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा अलिकडल्या काळात भाजपामध्ये मुक्काम वाढला आहे. या वाढलेल्या मुक्कामाचा फायदा घेत त्यांनी भाजपातील निष्ठावंतांना डावलत या पक्षाला चिखलीकर मित्रमंडळ प्रायव्हेट लिमीटेड असे स्वरूप दिले आहे. त्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होत आहे.

यांची होती उपस्थिती 

या अन्यायाला झुगारत नागनाथ घिसेवाड यांनी भाजपाला अखेरचा जय श्रीराम करत मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला.


भाजपला चिखलीकरांनी स्वतःची पार्टी बनविले - घिसेवाड


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण 2013 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षवाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले. प्रताप पाटील चिखलीकर यांना खासदार करण्यात महत्वपूर्ण भूमिका वठविली परंतु भाजपातील निष्ठावंत आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचा केवळ त्यांनी स्वार्थासाठी वापर करून घेतला. पक्षामध्ये त्यांना मानणार्‍या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनाच मानसन्मान व पदे दिल्या जात आहेत. भाजपाला जिल्ह्यात चिखलीकर प्रायव्हेट लिमीटेड पार्टी असे स्वरुप आले आहे. त्यामुळे जनतेचे व्यापकहित लक्षात घेऊन राज्याचे माजी मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

loading image