सारखणीमध्ये आयोजित अखिल भारतीय लेंगी स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल;  चार दिवसानंतर तहसील प्रशासनाला आली जाग

A case has been registered against the organizers of the All India Lengi Competition
A case has been registered against the organizers of the All India Lengi Competition

माहूर (नांदेड) : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील सारखणी येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय बंजारा लेंगी स्पर्धेच्या आयोजकांवर माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन सहित विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण सैराट फिल्म अभिनेत्री रिंकू राजगुरू व गायिका अश्विनी राठोड हे ख्यातनाम कलाकार होत्या. 

किनवट तालुक्यातील सारखणी येथे (ता.१६) रोजी संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून अखिल भारतीय लेंगी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमाला सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ आर्ची व दक्षिणात्य गायिका अश्विनी राठोड यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी उसळली होती.

गर्दीत अनेकांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्स न पाळणे व कोविड- १९ प्रादुर्भाव कालावधीत निष्काळजीपणाचे कृत्य करून कोरोना आजार पसरविण्याची शक्यता निर्माण करणे, शिवाय जिल्हाधिकारी नांदेड यांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या आदेशामधील अटीचे व नियमाचे उल्लंघन केले वगैरे इ. कारणासाठी आयोजक विशाल मधुकर जाधव, धनलाल नारायण राठोड, आशिष दयाराम राठोड, निलेश गोपा चव्हाण, विनोद प्रेमसिंग राठोड, विशाल दत्ता पवार सर्व राहणार सारखणी तालुका किनवट जिल्हा नांदेड यांच्या विरुद्ध (ता.२०) रोजी तहसीलदार किनवट यांच्या आदेशावरून व तलाठी गौतम सुदाम पांढरे तलाठी सज्जा दहेली यांच्या फिर्यादी वरून सिंदखेड पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान, आपत्ती व्यवस्थापन व मुंबई पोलिस कायदा च्या कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.

एकंदरीत बंजारा समाजाच्या लेंगी स्पर्धेला नावाजलेल्या सेलिब्रिटींची उपस्थिती गर्दीला कारण ठरणार हे जिल्हा प्रशासनाला चांगल्या प्रकारे ज्ञात होते. तरी देखील या कार्यक्रमाला सशर्त परवानगी देण्यात आली. पोलिसांनी मोजक्या मनुष्य बळावर जेमतेम बंदोबस्त तैनात करून वाखाणण्याजोगी कामगिरी केली होती. परंतु हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाल्याने कोविड-१९ नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही. ही बाब तालुका प्रशासनाला समजायला चार दिवस लागले हे मात्र कळण्यास मार्ग नाही. चार दिवसा नंतर आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून दाखल झालेल्या गुन्हा संदर्भाने तर्क वितर्क मांडले जात आहे.

संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केल्याने गुन्हा दाखल होत असेल तर एक वेळा काय दहा वेळा गुन्हा दाखल झाला तरी परवाह नाही. संत सेवालाल महाराज आमचे दैवत आहे. कोणी दैवतांच्या जयंतीचे राजकारण करीत असेल तर त्यांना लखलाभ. 
- विशाल जाधव, आयोजक, अखिल भारतीय लेंगी स्पर्धा, सारखणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com