मराठा आरक्षणाची लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय अ‍ॅटर्नी जनरलने भूमिका मांडावी- अशोक चव्हाण

file photo
file photo

नांदेड : मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. यासाठी देशातील उत्तमातील उत्तम वकिलांची टिम राज्यशासनाने उभी केली आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आपण मनातून प्रयत्न करत आहोत. परंतु आता ही लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय अ‍ॅटर्नी जनरलने केंद्राची भूमिका मांडली पाहिजे. या प्रकरणात पंतप्रधानांच्या माध्यमातून केंद्रांने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मराठा आरक्षण समितीच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. 

श्री. चव्हाण मराठा वधू- वर परिचय मेळाव्यात बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने मी प्रामाणिकपणे मराठा समाजाची बाजू नामवंत वकिलाच्या माध्यमातून सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मांडतो आहे. राज्यासह देशातील नामवंत विधिज्ञ सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्रीय पातळीवर देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला मात्र वेगळा न्याय

त्यामुळे सर्वपक्षीय खासदारांनी प्रधानमंत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या अनुकूल बाजूने न्यायालयात आपली भूमिका मांडण्यासाठी केंद्रातील अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली पाहिजे. इतर राज्याला वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला मात्र वेगळा न्याय असे होता कामा नये, असेही ते म्हणाले. मराठा समाजाच्या विकासासाठी ज्या इतर बाबी आहेत, यावरही मी लक्ष केंद्रित केले आहे. मराठा समाजाचे प्रश्न मी प्रामाणिकपणे यथाशक्ती सोडण्याचा प्रयत्नही करेल असेही अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले.

ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास 

वधु-वर सुचक मेळाव्या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, मराठा वधु-वर परिचय मेळावा घेणे काळाची गरज असून यातून समाजाला फार मोठी मदत होते. ग्रामीण भागात राहणारा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यासाठी वधु-वर परिचय मेळावा घेणे गरजेचे आहे. यासोबतच समाजाने उद्योग शिबीरे घेऊन तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. व्यवसायातसुध्दा या समाजाने पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती 

यावेळी आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार मोहन हंबर्डे, अ‍ॅड. बी. आर. भोसले, संध्या बालाजी कल्याणकर, नरेंद्र चव्हाण, आनंद चव्हाण, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कामाजी पवार, डॉ. गणेश शिंदे, चंद्रभान पाटील जवळेकर, संभाजी शिंदे, विठ्ठल पाटील, संगीता पाटील, डॉ. रेखा चव्हाण, कल्पना डोंगळीकर, शिवाजी खुडे, प्रा. संतोष देवराये, तानाजी हुस्सेकर, डॉ. विठ्ठल पावडे, मुन्ना कदम, रवी पाटील ढगे, अ‍ॅड. एल. जी. पुयड, प्रा. प्रेम कौशल्ये आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com