esakal | चिमुकल्यांच्या नशिबी उपेक्षितांचे जिणे, खेळण्याच्या वयातच अंगमोड मेहनत
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

बालमजुरांना शिक्षणाच्या प्रवाहात खरोखरच आणावयाचे असेल, तर सर्वप्रथम त्यांच्या पालकांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

चिमुकल्यांच्या नशिबी उपेक्षितांचे जिणे, खेळण्याच्या वयातच अंगमोड मेहनत

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : सद्यस्थितीत समाजातील दुर्बल, निराधार, गोरगरिबांच्या मुलांना उपेक्षितांचे जिणे जगावे लागत आहे. खेळण्या-बागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयातच अंगमोड मेहनत करून पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे.

समाजातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने रोजगार मिळवून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो; मात्र शिक्षण घेण्याच्या वयात जर लहान बालकांवर आपल्या घराचा आर्थिक गाडा ओढण्याची जबाबदारी येऊन ठेपली, तर अशा बालकांचे जीवन संपल्यागत होते. एकीकडे शासन शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. दुसरीकडे घरी पैसे दिले नाहीत, तर एकवेळच्या जेवणालाही मुकणाऱ्या चिमुरड्यंना काम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शाळा आणि शिक्षणापासून अशी असंख्य मुले कोसोदूर जात असल्याची विदारक परिस्थिती आहे.

हेही वाचा - मराठवाड्यातील रस्ते, पुल दुरुस्तीसाठी ५५० कोटींचा निधी ; अशोक चव्हाण

भीक मागण्यासाठीही होतोय उपयोग
आर्थिकदृष्ट्य़ा दुर्बल घटकांतील अशा मुलांचा काहीजण फायदा घेत आहे. कमी मोबदल्यात या मुलांना दिवसभर राबवून घेतले जाते. हद्द म्हणजे अशा मुलांचा भिक मागण्यासाठी उपयोग केला जात असल्याचा धक्कदायक प्रकार दिसून येत आहे. शासकीय यंत्रणा मात्र कागदावरच रेघोट्या ओढून खेळत आहे. त्यांच्या दृष्टीस हा प्रकार का दिसून येत नाही? हा संशोधनाचाच विषय आहे. हॉटेल, किराणा, कापड दुकान, हार्डवेअर, भंगार, वीटभट्टी अशा विविध ठिकाणी बालकामगार अंगमेहनतीची कामे करताना दिसून येत आहेत. सोळा वर्षांच्या आतील लहान मुलांना कामावर ठेवले तर शंभर रुपयांनी मजुरी कमी होते. सोळा वर्षांवरील कामगारांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरीचा सध्याचा दर आहे.

हेही वाचलेच पाहिजे - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकसेनेला दिलेला शब्द पाळला

पालकांना मिळावा रोजगार
बालमजुरी वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे सर्वच ठिकाणी रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. पिढ्यान पिढ्या कुटुंबप्रमुखांची मिळकत तोकड्या स्वरूपात असल्याने कुटुंबातील इतर सदस्यांचे पालनपोषण करणे कठीण होत असल्याने लहान मुलांनाही नाइलाजास्तव शिक्षणाकडे दुर्लक्ष करून बालवयातच रोजगाराच्या शोधात बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे त्यांची येणारी पिढीही त्याच मार्गावर आपले पाऊल ठेवत असल्याचे चित्र आहे. 

येेथे क्लिक कराच - करणी, भानामती करणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान

राजकीय अनास्था कारणीभूत
बालमजुरांना शिक्षणाच्या प्रवाहात खरोखरच आणावयाचे असेल, तर सर्वप्रथम त्यांच्या पालकांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र, यातच शासन आणि राजकीय नेते कमी पडत असल्याने बलमजुरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यासाठी पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याशिवाय बालमजुरीचे प्रमाण कमी होणे नाही, हे सत्य आहे.

loading image