विकास निधीवरून महाविकास आघाडीत घमासान ! 

file photo
file photo

नांदेड, जिल्हा परिषद अंतर्गत शासनाच्या दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त ५० कोटी रुपये विकास निधीचे नियोजन वर्ष अखेरीच्या मुदतीमुळे समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक यांनी बुधवारी मागच्या तारखेत केले. दरम्यान, सदस्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार विकास निधीचे नियोजन केल्याची सारवासारव काँग्रेसच्या गोटातून करण्यात आली.

 निधी वाटपातही पक्षपाती धोरण अवलंबिण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या गोटातून नाराजीचा सुर आवळत थेट न्यायालयात दाद मागण्याची तंबी देताच जिल्हा परिषदेच्या एका बड्या पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलाऊन नाराज गटाची मनधरणी करत काँग्रेसकडून सोमवारी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. 

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीला पदाअभावी सत्तेत राहूनही अधिकाराला मुकावे लागले. उपाध्यक्षांकडे आरोग्य व अर्थ समितीच्या कारभारामुळे शिवसेनेच्या एकमेव पदामुळे काँग्रेसवर दाबाव आहे. उपाध्यक्षांकडील दोन समित्या वगळता संख्याबळानुसार अध्यक्षांसह इतर समित्यांचा काँग्रेसकडे एकहाती कारभार आहे. दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत मागील दोन वर्षापासून प्राप्त ५० कोटी रुपये निधी नियोजना वरुन महाविकास आघाडीच्या घटकपक्षात चांगलेच घमासान सुरू आहे. 

शासन नियमानुसार योजने अंतर्गत विकासनिधी वर्ष अखेरीस खर्च होणे बंधनकारक आहे. अन्यथा योजनेचा अखर्चीत निधी शासन जमा करावा लागतो. त्यामुळे समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक यांनी बुधवारी दलितवस्ती विकास निधी अंतर्गत प्राप्त ५० कोटी रुपये निधीचे नियोजन केले. दरम्यान सदस्यांनी केलेल्या शिफारशीनुसार नियोजनाचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला.

समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी सदस्यामधील समन्वया अभावी मागील समितीच्या कालावधीत ३५ कोटी नियोजनाच्या ठराव प्रशासकीय मान्यतेसाठी वरिष्ठांसमोर मांडला नाही. पदाधिकारी निवडीपूर्वी वेळेत मान्यता अभावी २०१९-२० पर्यंतच्या ३५ कोटी रुपये निधीचे नियोजन खोळंबले होते. 

प्रशासनानेही नेम साधला
लॉकडाउन कालावधीत समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार रजेवर राहिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी मुदखेडचे गटविकास अधिकारी अनंत कदम यांच्याकडे श्री.आऊलवार यांचा प्रभारी पदभार सोपवला. दरम्यान दलितवस्ती विकास निधीच्या नियोजनाचे आदेश जारी केल्यापासून प्रभारी समाज कल्याण अधिकारी आनंत कदम ‘नॉट रिचेबल’ असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने सोईस्कर सक्षम अधिकाऱ्यास कर्तव्यापासून रोखून प्रभारी पदभारावरुन नेम साधला. 

निधी नियोजनामध्ये पक्षपाती धोरण अवलंबिण्यात आल्याने जिल्हा परिषद गटातील वंचित वस्त्यांच्या विकासाचा प्रश्न पुढे करत राष्ट्रवादीचे गटनेते तथा माजी उपाध्यक्ष समाधन जाधव यांनी राष्ट्रवादीच्या तिन्ही गटातील नाराज सदस्यांशी समन्वय साधला. प्राप्त निधीच्या तुलनेत तुटपुंजा विकास निधी मिळाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने नाराजीचा सुर आवळला. सदस्यांच्या शिफारशीनुसार निधीचे नियोजन केल्याची सारवा सारव करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर महाविकास आघाडीतील नाराजांची मनधरणी करण्यासाठी शुक्रवारी तातडीची बैठक बोलवावी लागली. 

भाजप आक्रम शिवसेनेत धुसपुस

  दलिवस्ती विकास निधी नियोजनामध्ये पक्षपती धोरण हानुन पाडण्यासाठी मा. न्यायालयात दाद मागण्याचा गर्भीत इशारा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने दिला. समन्यायी वाटपाचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेच्या गोटातही निधी वाटपावरुन धुसपुस सुरू असून सोमवारी उपाध्यक्षा पदमा सतपलवार यांच्या कक्षात नाराजांची बैठक होणार असल्याचे विश्वासनिय सुत्रांकडून सांगण्यात आले. 

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलप पाटील बेटमोगरेकर यांच्या वहिनी तथा महिला व बालकल्याण सभापती सुशिला हनुमंत बेटमोगरेकर पाटील यांच्या निवास्थानी शुक्रवारी नाराजांच्या मनधरणीसाठी आयोजित बैठकीमध्ये नियोजनाबाबत सोमवारी तोडगा काढण्याचे आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com