esakal | मरखेल ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मरखेल गटात कोरोनाची एन्ट्री, आतापर्यंत चार रुग्णांची नोंद

मरखेल ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा

sakal_logo
By
सद्दाम दवाणगीकर

मरखेल (जिल्हा नांदेड) : गेल्या काही दिवसांपासून केवळ महानगरातच कोरोना आजार असल्याचे ऐकिवात असताना मरखेल गटातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून आले आहे. मरखेल पोलीस ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यावर आरोग्य यंत्रणेसह, पोलीस विभाग व स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. संबधित पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी स्वतःचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून स्वतःहून आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी पाठविले असून, संबंधितांनी येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये क्वारंटाईन केले आहे. दरम्यान मरखेल    जिल्हा परिषद गटात या पोलीस अधिकाऱ्याला धरून आत्तापर्यंत चार रुग्णांना कोरोनाची बाधा असल्याचे निदान झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
       
येथील पोलीस ठाण्याचे अधिकारी हे गत चार दिवसांपूर्वी स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. काल (ता. २१) रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  तर भुत्तनहिप्परगा येथील एका ३५ वर्षीय पुरुषाचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. तर यापूर्वी भुत्तनहिप्परगा येथील ६० वर्षीय इसम व मोतीराम तांडा येथील एका पुरुषाचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान येथील पोलीस ठाण्यात या अहवालामुळे एकच खळबळ उडाली असून अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले स्वॅब आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी पाठवून दिले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. दरम्यान उपरोक्त तीन कर्मचाऱ्यांनी येथील जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये स्वतः क्वारंटाईन केले आहे.

हेही वाचा -  Good news:नांदेडला डीएनए आणि सायबर चाचणी शक्य- पालकमंत्री अशोक चव्हाण

संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे चालू 

दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी आकाश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे, मरखेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यु. आर. पाटील यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून संबंधितांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने पोलीस ठाणे व शासकीय वाहन सॅनीटायझर करण्यात आले आहे. दरम्यान उपरोक्त अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय अहवालावर इतर कर्मचारी व पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांचे भवितव्य अवलंबून आहे. याशिवाय भुत्तनहिप्परगा येथील दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या गावातही खबरदारी घेण्यात आली असून, संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे चालू असल्याची माहिती आहे. येथील बाधा झालेल्या पोलीस अधिकाऱ्याला आरोग्य विभागाच्या टीमने पुढील उपचारासाठी देगलूरला नेल्याचे समजते. तर संबधित अधिकारी यांची पत्नी व मुलीचाही स्वॅब आरोग्य विभागाने घेतला असुन, जवळपास पाच लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे


 

loading image