कोरोना : विद्यार्थ्यांसाठी कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस 

file photo
file photo

नांदेड : सध्या राज्यभर कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशा काळात शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन जाहिर केला होता. त्याचे परिणाम गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहेत. उद्योग धंदे पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. अनेकांच्या हाताला काम उरलेले नाही, अनेक जणांची हालाकीची परिस्थिती झाली आहे, काही ठिकाणी उद्योगधंदे ठप्प झाले आहे. राज्याच्या तिजोरीवर देखील ताण आला आहे, पालक आणि  शाळा महाविद्यालये देखील अपवाद नाहीत. 

शाळा महाविद्यालये, कोचिंग क्लासेस या महामारीमुळे गेली ४- ५ महिने बंद आहेत, बऱ्यापैकी कामकाज कमी झाले आहे किंवा विद्यार्थ्यांचे वर्ग प्रत्यक्षात विद्यालय आवारात भरत नाही. परिणामी शाळा महाविद्यालयांना कुठल्याही प्रकारचा अधिकचा खर्च सध्या चालू नाही. उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि वार्षिक अभ्यासक्रमाबाबत कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून काही ठिकाणी ऑनलाइन वर्ग चालू केले आहेत. 
 
विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा 

मात्र काही ठिकाणी शाळा, महाविद्यालये अधिकचे शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना आढळून येत आहे. तर काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहेत. अशावेळेस काही शाळांसोबत व विद्यालयांसोबत संपर्क केला असता त्यांच्याही काही अडचणी आहेत असे जाणून आले. मात्र पालक वर्गाचे देखील बरेच नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले गेलेले आहे. 

‘कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान’ 

अशा परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क मागणी या बाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी मांडली आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून येणाऱ्या काळामध्ये ‘कोरोना शिक्षण शुल्कनीती अभियान’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सूचित केले आहे.

या आहेत मागण्या

१. शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये.
२. शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे.
३. निश्चित केलेले शुल्क टप्प्या टप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
४. कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये.

कोविड शिक्षण शुल्कनीती समजावून सांगणार 

वरील शुल्कनीती सर्व शाळा, महाविद्यालय व क्लासेस समजावून सांगत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मराठवाडा विभागाचे नवनिर्वाचित विभागीय प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम हे सर्व शाळा, विद्यालय व  क्लासेस यांना प्रत्यक्ष भेट देऊन वरील कोविड शिक्षण शुल्कनीती समजावून सांगणार आहेत. 

शैक्षणिक संस्थांकडून नाहक त्रास झाल्यास आंदोलन

त्याचबरोबर या शिक्षण शुल्कनीतीचा अवलंब करण्याचा आग्रह धरणार आहे व तसे न करता विद्यार्थ्यांना वा पालकांना शैक्षणिक संस्थांकडून नाहक त्रास झाल्यास विद्यार्थी काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल अशी माहिती  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी एक पत्रकाद्वारे मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com