नांदेडमध्ये कोरोनामुळे मिळेना भाडेतत्वावर घर 

प्रमोद चौधरी
Tuesday, 18 August 2020

कोरोनाचा वाढता कहर पाहता या महामारीच्या धास्तीने घरमालक आर्थिक अडचणीत सुद्धा भाडेतत्वावर घर देण्यासाठी टाळत आहेत.   

नांदेड : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच फटका शहरातील घरमालक व भाडेकरूंना बसला आहे. एकीकडे बाधित भागातील भाडेकरू कोरोनाच्या धास्तीने इतरत्र स्थलांतर करीत आहेत तर, दुसरीकडे घरमालक भाडेकरुंना घर भाडे तत्त्वावर देण्यासाठी टाळत असल्याचे चित्र आहे.  

कोरोनाचा नांदेड शहरासह तालुक्यात मोठा संसर्ग झाल्याने त्याचा जसा अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला तसाच घर भाड्याने दिल्या जाणाऱ्या क्षेत्रातही मोठा फटका बसला. कोरोनाच्या काळात अनेक भाडेकरुंना घरमालकांकडून भाडे कमी करण्याबाबत अपेक्षा होती. शासनही हस्तक्षेप करेल, असा भाबडा समजही होता. पण, उपयोग झाला नाही. भाडेकरूंसोबतच घरमालकही घरीच बसून होते. त्यामुळे दोघांची आर्थिक कोंडी वाढत गेली. अनेक परराज्यामधील कामगार भाडेकरू, शिक्षणासाठी आलेले, नोकरी गमावलेले यांनी मुळगाव जवळ केले. जुने भाडेकरू गेल्याने घरे रिकामी झाली. मात्र, कोरोनाचा वाढता कहर पाहता या महामारीच्या धास्तीने घरमालक आर्थिक अडचणीत सुद्धा भाडेतत्वावर घर देण्यासाठी टाळत आहेत.   

हेही वाचा साज चढला, घुंगरे बांधली...पण बैल मिरविलाच नाही

नोकरवर्गाची कोंडी 
नांदेडमध्ये रोजगारासाठी सर्वदूरहून मोठ्या संख्येने लोक येतात. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची सुद्धा वर्णी आहे. तात्पुरते भाडे तत्वावर राहून मुलांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून येथेच स्थायिक होतात. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे अनेकांची नोकरी गेली, काहींना वेतन नाही, काहींना त्रोटक पगार मिळत असल्याने अशांनी सुद्धा नोकरीवर पाणी सोडले होते. मात्र, शासनाने पुन्हा अनलॉक प्रक्रिया सुरू केल्याने शासकीय-निमशासकीय कार्यालये पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी शहरात येण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, तात्पुरता निवारा मिळावा म्हणून, घर भाडे तत्वावर घेण्यासाठी वणवण फिरत आहेत. मात्र, बहुतांश घरमालक कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता घर भाड्याने देण्यास टाळत आहे. त्यामुळे, कोणी घर देता का घर अशी, आर्त हाक दबक्या आवाजात कानी पडत आहे. 

हे देखील वाचाच - घोरबांड कुटुंबिय बनवताहेत इकोफ्रेंडली गणपती, कशापासून? ते वाचाच

शाळा बंद असल्याने अर्थचक्रावर परिणाम 
शिक्षणाच्या बाबतीत नांदेड अव्वल आहे. त्यामुळे, शालेय, महाविद्यालयीन, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात राहत होते. पण, कोरोनाच्या उद्रेकमुळे शैक्षणिक कामकाज ठप्प आहे. याच विद्यार्थ्यांच्या भरवश्यावर मेसचालक, घरमालक यांची मदार होती. त्यांच्यावरच या घटकाचे उत्पन्न होते. त्यामुळे, याचा परिणाम घरमालक व मेस चालकांच्या अर्थचक्रवर झाला.  

येथे क्लिक कराच - नांदेड मनपा क्षेत्रात केल्या दहा हजार अॅंटिजेन तपासण्या

बाधित परिसरातील घरे ओस 
शहरात दाट लोकवस्तीत कोरोनाचा शिरकाव अधिक झाला. त्यामुळे, बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या अवागमनावर निर्बंध आल्याने ही बंदी उठवताच, या वसाहतीत राहणाऱ्या भाडेकरूंनी आपले मुळगाव जवळ केले. काहींनी संसर्ग टाळण्यासाठी विरळ भागात राहण्यास प्राथमिकता दिली. असुरक्षित, दाट वस्तीमध्ये शिवाय, बाधित म्हणून होऊन गेलेल्या परिसरात राहण्यासाठी कोणी धजावत नसल्याने ही घरे ओस पडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona In Nanded Did Not Get A House On Rent Nanded News