esakal | महाविकास आघाडीचे देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईत निधन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अभियंता ते आमदार असा प्रवास करणारा निगर्वी नेता काळाच्या पडद्याआड

महाविकास आघाडीचे देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईत निधन

sakal_logo
By
अनिल कदम

देगलूर (जिल्हा नांदेड) : देगलूर- बिलोली विधानसभेचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे अल्पशा आजाराने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवार  (ता. नऊ)  रोजी रात्री साडेअकरा वाजता दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६३  वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शितलताई अंतापूरकर, मुलगा जितेश, दोन मुली, वृद्ध आई ,एक भाऊ असा परिवार आहे. 

आमदार अंतापूरकर यांचा जन्म अंतापूर (ता. देगलूर) येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील जयवंतराव अंतापूरकर हे सार्वजनिक बांधकाम खात्यात गँगमन म्हणून कार्यरत होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे रावसाहेब अंतापूरकर यांनी आपले शालेय शिक्षण प्रारंभी अंतापुर व नंतर देगलूर येथे वसतिगृहात राहून पूर्ण केले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबई नगर विद्युत कंपनीत अभियंता म्हणून  प्रशासकीय नोकरी ला सुरुवात केली . नोकरी करीत असतानाच त्यांनी "मातंग समाज विकास" संघटनेची स्थापना करून संपूर्ण महाराष्ट्रात समाजाची संघटना बांधली. यातून अनेकांना रोजगार मिळाला  तर काहींना मुंबईत आधार मिळवून दिला. याच संघटनेच्या मुशीतून तयार झालेले सुधाकरराव भालेराव पुढे उदगीर मतदार संघाचे दोनदा आमदार झाले. २००८ साली  त्यांनी रावसाहेब अंतापूरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून देगलूर तालुक्यातील सार्वजनिक कामांना सुरुवात केली होती. 

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी केली मतदार संघ पुनर्रचनेनंतर देगलूर बिलोली हा मतदारसंघ "राखीव" झाला. तत्कालीन खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी श्रेष्ठींना दिलेल्या शब्दाखातर अंतापूरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. अपेक्षेप्रमाणे त्यात ते विजयी ही झाले. मात्र कालांतराने त्यांच्यात व खतगावकरांत राजकीय वितुष्ट निर्माण झाल्यानंतर त्यांनी अशोकरावांचे नेतृत्व मान्य केले. २०१४ साली ते माजी आमदार सुभाषराव साबणे यांच्याकडून अल्पशा मताने पराभूत झाल्यानंतर ही त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची नाळ कधी तोडली नाही. २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्याजवळ असलेल्या अल्पशा यंत्रणेसह केवळ जनमताच्या रेट्यामुळे ते विधानसभेत दुसऱ्यांदा पोहोचले. 

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा त्यांना भक्कम आधार व सदैव साथ असल्याने मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लागत असतानाच, राज्याच्या आर्थिक अर्थसंकल्पात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन मतदार संघात पोहोचल्या नंतरच गेल्या पंचवीस दिवसापूर्वी त्यांना आजाराने गाठले. प्रथम नांदेड येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. त्यातच त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने शेवटी शुक्रवार ता. नऊ रोजी रात्री ११:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त देगलूर येथे धडकताच तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. शनिवार ता. १० रोजी सायंकाळी चार वाजता  त्यांच्या  मूळ गावी अंतापूर येथे त्यांच्या शेतात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. 

सहकारी गमावल्याचे दुःख पालकमंत्री

काँग्रेस पक्षाचा एक सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ते असलेले रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला व मला स्वतः ला धक्का बसला असून त्यांच्या निधनाने पक्षाने सच्च्या व प्रामाणिक कार्यकर्त्यांना गमावल्याचे दुःख आहे अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी नोकरी करीत राजकारणात प्रवेश केला होता. सर्वसामान्य माणसाशी असलेली नाळ त्यानी जीवनाच्या अखेरपर्यंत जोपासली, त्यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी शोकभावना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे