वीजचोरी विरोधात मोहीम- तेरा दिवसाच्या कारवाईत ५,४३८ वीजचोर आकोडे बहाद्दरांचा पर्दाफाश

प्रल्हाद कांबळे
Sunday, 1 November 2020

परिमंडळातील तीनही जिल्हयातील सर्व उपविभागा अंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहूल गावांमध्ये वीजकायदा २००३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

नांदेड : नांदेड परिमंडळातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने ता. १९ ऑक्टोबरपासून चालू केलेल्या धडक मोहिमेत आकोडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या ५,४३८ वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. या मोहीमेत तीन ठिकाणी कर्मचाऱ्यास मारहाण झाली तरिही खचून न जाता ही मोहिम यापुढेही चालूच राहणार असून परिमंडळातील तीनही जिल्हयातील सर्व उपविभागा अंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहूल गावांमध्ये वीजकायदा २००३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. या मोहीमेत अडथळा आणणाऱ्या वीजचोरांविरोधात प्रसंगी गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिला आहे.

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र  नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकोडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहीमेत गेल्या तेरा दिवसात आक्रमकपणे गती देत परिमंडळातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीनही जिल्हयात ५,४३८ चोरून वीजवापरणाऱ्या आकोडे बहाद्दरांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या मोहीमेत महावितरणच्या कर्मचाऱ्यास मज्जाव करत मारहाण करणाऱ्या पाच वीजचोरांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचामाहूर तालुक्यात १५ हजार पाळीव प्राण्यांची आधार नोंदणी पूर्ण -

नांदेड जिल्हयात २,२०८ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या

नांदेड जिल्हयात २,२०८ वीजचोऱ्या पकडण्यात आल्या यामध्ये सर्वाधिक भोकर विभागामधील ८६६ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. देगलूर विभागात ५७४, नांदेड शहर विभागात २६४ तर नांदेड ग्रामीण विभागातील ५०४ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर परभणी जिल्हयातील २,३६१ आकोडे वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. तर हिंगोली जिल्हयातील ८६९ आकोडे बहाद्दर वीजचोरांवरती कारवाई करण्यात आली.

अधीकृत वीजजोडणी घेवूनच वीजवापर करावा असे आवाहन

वीज चोरी पकडल्यानंतर ग्राहकांला वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर आकारणीचे बिल न भरल्यास सबंधितांवर गुन्हाही दाखल होवू शकतो. यामध्ये आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करतांना महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विघुत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्याकडून विजेचा वापर केल्यास व शेजाऱ्याने परस्पर वीज पुरवठा केल्यास दोघांवरही  कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शेजाऱ्याकडून मीटरही बंद होवू शकते. व आकडा टाकून विजेचा वापर करणे, वीजवाहिनीमध्ये छेडछाड करणे  अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर केल्यास संबंधीत ग्राहकांवर कलम १३५, १३८ नुसार कारवाई करण्यात येते. प्रसंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होवून संबंधितांना अटकही होवू शकते. या वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. त्यामुळे अधीकृत वीजजोडणी घेवूनच वीजवापर करावा असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhadak campaign against power theft - 5438 power thieves Akode Bahadur exposed in 13 days operation nanded news