esakal | धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांची वाळू माफियांविरुद्ध कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

धर्माबाद तालुक्यातील आटाळा शिवारात नदीपात्रातून तराफे काढून जाळले

धर्माबाद तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांची वाळू माफियांविरुद्ध कारवाई

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : धर्माबाद तालुक्यातील आटाळा या शिवारातील गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी थर्माकोलच्या तराफ्याचा वापर केला जात असल्याची गुप्त माहिती महसूल विभागास मिळाली. तेंव्हा परिसरात जाऊन पाहणी केली असता एक भला मोठा थर्माकोलचा तराफा नदीपात्रात असल्याचे निदर्शनास आले. हा तराफा नदीपात्रातून काढून जाळून नष्ट केला. वाळू माफियांविरुद्धची ही धडाकेबाज कारवाई तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता केली.

गतवर्षीपासून वाळू धक्क्याचे लिलाव झाले नसल्याने धर्माबाद तालुक्यातील संगम, मनूर, नेरली, बामणी, विळेगाव (थडी), मोकली, रामपूर, पाटोदा, रोषणगाव, चोंडी, आटाळा, येल्लापूर या परिसरात गोदावरी नदीपात्रातून टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात आहे. फुकटच्या वाळूला सोन्याचा भाव मिळत असल्याने वाळू माफिया " रग्गड " कमाईतून " गब्बर " झाले आहेत. गेल्या उन्हाळ्यात वाळू माफियांनी नदीपात्रात धुमाकूळ घातला होता. अद्यापही वाळू धक्क्याचे लिलाव झाले नाही. 

हेही वाचाबारावी विद्यार्थ्यांना पुन्हा संधी ; परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

सध्या गोदावरी नदीपात्रात पाणी भरपूर असल्यामुळे नदीपात्रातून वाळू बाहेर काढणे अडचणीचे ठरत आहे. तरीही वाळू माफियांनी नवनवीन शक्कल लढवत वाळू उपसा करण्यासाठी जोर लावत आहेत. तालुक्यातील आटाळा या शिवारात गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी थर्माकोलच्या तराफ्याचा वापर करीत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागास मिळाली. तेंव्हा महसुलचे कर्मचारी गुरुवारी सकाळी अकरा वाजता परिसरात जाऊन पाहणी केली असता एक भला मोठा थर्माकोलचा तराफा नदीपात्रात असल्याचे निदर्शनास आले. सदरील तराफा हा १४ बाय १४ आकाराचा मोठा असल्याने बाहेर काढण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. 

हा तराफा नदीपात्रातून बाहेर काढून जाळून नष्ट करण्यात आला. परिसरात आजूबाजूला पाहणी केली असता वाळूचे साठे कुठेही दिसून आले नाहीत. वाळू माफियांविरुद्धची ही धडाकेबाज कारवाई तहसीलदार दत्तात्रय शिंदे, उमरीचे तहसिलदार माधव बोथीकर, मंडळ अधिकारी नामदेव माळोदे, गणेश गरुडकर, जी. डी. पवळे, तलाठी उल्हास आडे, माधव पांचाळ, डी. जी. कदम, सय्यद मुर्तूजा, एल. बी. आंबेराये, पी. पी. देशपांडे, बी. बी. लोणे, सचिन उपरे, वाहनचालक सोनकांबळे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड, ढगे व अलीम यांनी संयुक्त अशी कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.


संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image
go to top